"भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं, अन्यथा...", बांगलादेश हिंसाचारावर महंत राजू दास यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 03:04 PM2024-08-06T15:04:57+5:302024-08-06T15:06:37+5:30
Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Bangladesh Crisis : बांगलादेशातील परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. संसद भवन परिसरात ही सर्वपक्षीय बैठक झाली. या सर्वपक्षीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील परिस्थितीबाबत सर्वांना माहिती दिली.
दुसरीकडे, बांगलादेशातील परिस्थितीबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हनुमानगढीचे महंत राजू दास यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राजू दास यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, "भारतानं बांगलादेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची, हीच वेळ आहे. अन्यथा बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा जास्त त्रास देईल. नरेंद्र मोदीजी, तुम्ही पुढे जा, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे." तत्पूर्वी एका व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "हिंदूंनो, तुमचा कष्टाचा पैसा उद्या असाच लुटला जाईल. मग तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यामुळं आजच काहीतरी करा."
दरम्यान, बांगलादेशातील परिस्थितीबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बांगलादेशातील परिस्थिती आणि भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपल्या सरकारी निवासस्थानी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांगलादेशातील संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली. बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतात आलेल्या शेख हसीना यांच्यासोबतची भेट, बांगलादेशातील ताज्या राजकीय परिस्थिती आणि तेथील हिंसाचाराची सततची परिस्थिती याबद्दल माहिती दिली.
बांगलादेशात आंदोलकांनी हिंदूंना केलं लक्ष्य
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेला हिंसाचार शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही थांबलेला नाही. दरम्यान, या आंदोलकांनी देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलक जमावाकडून हिंदूंना त्रास दिला जात आहे. काहींच्या घरांची जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींची दुकानं लुटण्यात आळी आहेत. यादरम्यान, मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरामध्ये दंगेखोरांनी तोडफोड करून मंदिराला आग लावल्याचे वृत्त आहे.