'बांगलादेश सरकारने तातडीने हिंदूंना सुरक्षा द्यावी';दुर्गापूजेवर झालेल्या हल्ल्यांनंतर भारताचा कडक संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 04:45 PM2024-10-12T16:45:18+5:302024-10-12T16:47:38+5:30
बांगलादेशमध्ये हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आलेल्या घटना काही दिवसापासून समोर येत आहेत.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या दुर्गा पूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरे आणि पूजा मंडपांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल भारताने शनिवारी गंभीर चिंता व्यक्त केली. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या हल्ल्यांचा निषेध करणारे एक विधान जारी केले आणि बांगलादेश सरकारला आपल्या अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षा देण्याचे आवाहन केले.
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "ढाका येथील तंतीबाजार येथील पुजा मंदिरावरील हल्ला आणि सतीखीरा येथील प्रसिद्ध जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल आम्ही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या घटना निंदनीय आहेत आणि मंदिरे आणि देवतांच्या विध्वंसाचे उदाहरण आहे. भारताने बांगलादेश सरकारला त्वरित कारवाई करण्याचे आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे आवाहन केले.
बांगलादेशमध्ये हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आलेल्या घटनांनंतर हे वक्तव्य आले आहे. शुक्रवारी रात्री ढाक्याच्या तंटीबाजार भागात एका मंदिराला आग लागल्याने पूजा करणाऱ्या भाविकांमध्ये घबराट पसरली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या गोंधळात पाच जण जखमी झाले आहेत. तसेच, बांगलादेशच्या दक्षिण-पश्चिम सतीखिरा जिल्ह्यातील दुर्गापूजेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला सोन्याचा मुकुट हिंदू मंदिरातून चोरीला गेला.
बांगलादेश पोलिसांनी या महिन्यात दुर्गापूजेदरम्यान झालेल्या सुमारे ३५ हिंसक घटनांप्रकरणी १७ जणांना अटक केली आहे. बांगलादेशचे पोलीस महानिरीक्षक मोइनुल इस्लाम यांनी याबाबत सांगितले की, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जो कोणी हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.