बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:28 PM2024-12-11T23:28:45+5:302024-12-11T23:29:27+5:30
बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी भारत-बांग्लादेश संबंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचार, द्विपक्षीय करार आणि तेथील राजकीय परिस्थिती या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.
परराष्ट्र सचिवांनी सांगितले की,बांगलादेशने अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, बांगलादेश सरकारने या घटनांना दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती असल्याचे म्हटले असून भारताने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, बैठकीत बहुतेक सदस्यांनी कोणत्याही पक्षाची पर्वा न करता शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्याबद्दल विचारपूस केली.
बैठकीत उपस्थित खासदारांनी अनेक प्रश्न विचारले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातील राहणीमानावर होता. मात्र, परराष्ट्र सचिवांनी यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. समितीचे खासदार बांगलादेशला भेट देऊ शकतात, असेही शशी थरूर यांनी सुचवले. याशिवाय, भूतानला भेट देण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. भारत आणि बांगलादेशमधील सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक संपत्तीवरील हल्ल्यांबाबत भारताच्या चिंतेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
भारत आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसिम उद्दीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल आणि कल्याणाबाबत भारताने चिंता व्यक्त केल्याचे विक्रम मिश्री यांनी सांगितले. तसेच, या बैठकीत भारताने सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत आपले आक्षेप नोंदवले होते. बांगलादेश प्रशासन या मुद्द्यांवर विधायक दृष्टिकोन स्वीकारेल आणि दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे नेतील, अशी आशा विक्रम मिश्री यांनी व्यक्त केली.