महापुरामुळे डोक्यावरुन छत हरवलेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने दिला आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 04:26 PM2017-08-21T16:26:57+5:302017-08-21T16:38:50+5:30
पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत
ढाका, दि. 21 - पश्चिम बंगालमध्ये पुराने थैमान घातला असून अनेकजण बेघर झाले आहेत. अशाच बेघर झालेल्या 800 भारतीयांना बांगलादेशने आसरा दिला आहे. बांगलादेश सीमारेषवर असलेल्या मोगलघाट आणि लालमोनिरहाट येथे सध्याच्या घडीला अनेक भारतीयांनी आश्रय घेतला आहे. बंगालमधील धारला नदीला पूर आला असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांनी आपलं घर सोडून स्थलांतरण करावं लागलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पाच लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, नेपाळच्या चितवन या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात पुरामुळे २०० भारतीय पर्यटक अडकून पडले आहेत.
मोगलघाटमधील हबीबूर रेहमान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुरामुळे दुर्गापूर आणि मोगलघाटमध्ये 800 भारतीयांनी आश्रय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माणुसकीच्या आधारे भारतीयांना येथे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिली आहे
बॉर्डर गार्ड बांगलादेशने दिलेल्या माहितीनुसार, 'बांगलादेश सीमारेषेजवळील दोन गावांना पुरांचा फटका बसला आहे. माणुसकीच्या नाते आम्ही भारतीय नागरिकांना आश्रय घेण्याची परवानगी दिली आहे'. बॉर्डर गार्ड बांगलादेशने जर आम्हाला मदत केली नसती तर आम्ही पुराच्या पाण्यात वाहून गेलो असतो असं 75 वर्षीय बशीरुद्दीन यांनी सांगितलं आहे. आश्रय घेतलेल्या भारतीयांनी परिस्थिती सुधारली की आम्ही पुन्हा मायदेशी परत येऊ असं सांगितलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुराने ३२ लोकांचा बळी घेतला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांमधील १४ लाख लोक पुरामुळे हवालदिल झाले आहेत. भूतान, बिहार आणि झारखंडच्या नद्यांना पूर आल्याने पश्चिम बंगालमध्ये पूर आला आहे. पुरामुळे राज्यात १०४ पाळीव जनावरे देखील मृत्युमुखी पडल्याची माहिती बंगालच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आसाम, बिहार,पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून ५० लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तरमधील रेल्वेसेवा सद्या बंद करण्यात आली आहे. बिहार राज्यामध्ये पुरामुळे ७२ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ७३.४४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.