'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 07:09 PM2023-08-24T19:09:28+5:302023-08-24T19:10:31+5:30

चांद्रयान ३ च्या यशामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे अभिनंदन केलं आहे.

Bangladesh Prime Minister Sheikh Hasina has congratulated India on the occasion of Chandrayaan-3 | 'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

googlenewsNext

नवी दिल्ली: चांद्रयान-३ ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन यशस्वी ठरले अन् संपूर्ण देशभरातील लोकांना जल्लोष केला. चांद्रयान-३ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आलं. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माहिती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम १४ दिवसांसाठी चालणार आहे.

इस्त्रोच्या या कामगिरीचं देशासह जगभरातून कौतुक होत आहे. याचदरम्यान आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे अभिनंदन केलं आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की, भारताच्या चंद्र मोहिमेच्या यशाबद्दल बांगलादेश आनंदी आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात विज्ञानाची प्रगती करणे ही सर्व दक्षिण आशियाई देशांसाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. शेख हसीना यांनी संदेश पाठवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले.

‘चंद्रयान-३चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन. चंद्रावर अंतराळ यानाचे यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन! या मोहिमेमध्ये तुमचा भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे,’ अशी पोस्ट नासाचे बिल नेल्सन यांनी सोशल मीडियावर केली. अविश्वसनीय! तमाम भारतवासीयांचे आणि इस्त्रोचे अभिनंदन! नवे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याचा आणि दुसऱ्या खगोलीय पिंडावर भारताचे पहिले सॉफ्ट लँडिंग साध्य करण्याचा किती चांगला मार्ग आहे. खूप छान, मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत युरोपियन स्पेस एजन्सीच्या महासंचालकांनी कौतुक केले. पुढे, आम्हीदेखील यातून खूप चांगले धडे शिकत आहोत, असेही लिहिले.

अजून एक इतिहास रचला!

चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान-३ सुखरूप उतरताच सोशल मीडियाच्या जगतातही भारताने इतिहास रचला. चंद्रयान ३ च्या ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ने जागतिक विक्रम मोडला. इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर लँडिंग होताना सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटाला तब्बल ८०,५९,६८८ जणांनी लाइव्ह सोहळा पाहिला. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील विरुद्ध क्रोएशिया सामन्यादरम्यान ६.५ दशलक्ष दर्शक मिळवणाऱ्या युट्यूबर कॅसिमिरोच्या नावावर यापूर्वीचा विक्रम होता.

मी चंद्रावर उतरलोय... अन् भारतही

इस्रोने एक्स(पूर्वीचे ट्विटर)वर संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान-३ च्या वतीने, 'भारत, मी चंद्रावर पाेहाेचलाे आणि तुम्हीही' असे लिहून मिशन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यावर अवघ्या तासाभरात ट्विटरवर तब्बल २९ ट्रेंड पाहायला मिळाले. बुधवारी संध्याकाळी चंद्रयान-३चा विक्रम लँडर योग्य पोझिशनमध्ये असताना इस्रोच्या टीमने ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) कार्यान्वित केले. त्यामुळे प्रथम विक्रम लँडर व त्यानंतर प्रग्यान रोव्हरने चंद्रावर दाखल होताच पहिले काम केले ते छायाचित्रे काढली व ती पृथ्वीवर पाठविली. चंद्रयान-३च्या यशानिमित्त झालेले ते एकप्रकारचे फोटोसेशनच होते.

Web Title: Bangladesh Prime Minister Sheikh Hasina has congratulated India on the occasion of Chandrayaan-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.