मोठी बातमी! भारतात शरण येण्यासाठी हजारो हिंदू बांगलादेशच्या सीमेवर जमले, काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 07:29 PM2024-08-09T19:29:45+5:302024-08-09T19:32:04+5:30
बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात अनेक अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू आहेत.
कूचबिहार - बांगलादेशात सध्या हाहाकार माजला असून याठिकाणी हिंसक आंदोलनकर्ते हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हिंदू समुदायाची घरे, मंदिरांवर बांगलादेशात हल्ले सुरू आहेत त्यामुळे बांगलादेशात राहणारा हिंदू भारत बांगलादेश सीमेवर कूचबिहार जिल्ह्यातील काटेरी तारांच्या पलीकडे मोठ्या संख्येने जमले आहेत. ही परिस्थिती पाहता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या १५७ तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत.
बांगलादेशात राहणारे हिंदू काटेरी ताऱ्यांपासून ४०० मीटर अंतरावर गैबंडा जिल्ह्यातील गेंडुगुरी, दैखवा गावात एकत्रित आले आहेत. शुक्रवारी सकाळपासून हे लोक इथं जमण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे कूचबिहारच्या सीमेअलीकडे शीतलकुचीच्या पठानटुली गावात बीएसएफच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे. या परिस्थितीवर जवान करडी नजर ठेवून आहेत.
सरकारनं केलं समितीची स्थापना
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. ही समिती बांगलादेशातील समकक्ष अधिकारी यांच्याशी संपर्कात राहतील. जेणेकरून तिथे राहणाऱ्या भारतीय नागरीक, हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी घेतली जाईल. या समितीचं अध्यक्षपद एडीजी, सीमा सुरक्षा दलाचे माजी अध्यक्ष करतील. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये महानिरिक्षक,बीएसएफ फ्रंटियर मुख्यालय दक्षिण बंगाल, महानिरिक्षक, बीएसएफ फ्रंटियर मुख्यालय त्रिपुरा आणि अन्य लोक असतील.
#BangladeshCrisis l Several #Bangladeshis belonging to minority who fell victim of violence, gather in #WestBengal's Cooch Behar. Troops of 157 Battalion of the #BSF have been deployed in the area.#BSFinAction#HindusUnderAttackInBangladesh#Violence#India#Bangladesh#crisispic.twitter.com/DxIPmH8eXS
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) August 9, 2024
हजारो बांगलादेशी हिंदूही जलपाईगुडी येथे जमले
याआधी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी इथं भारत बांगलादेश बॉर्डरवर १ हजाराहून अधिक बांगलादेशी हिंदू पोहचले आहेत. त्यांना भारताच्या सीमेत प्रवेश करायचा आहे. मात्र भारताने बेकायदेशीर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकारामुळे भारत-बांगलादेश सीमेवर जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
भारतानं शरण देण्याची मागणी
बॉर्डर पलीकडे एकत्रित जमलेले बांगलादेशी हिंदूंनी म्हटलं की, आमची घरे, मंदिरे जाळण्यात येत आहेत त्यामुळे आम्हाला भारतात शरण यायचं आहे. मात्र भारतात इतक्या मोठ्या संख्येने शरण येण्यासाठी जमलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सीमेवरच रोखून धरले आहे.