प्रेमाची जादू! बांगलादेशची तरुणी राजस्थानात आली; विवाहित प्रियकरासाठी 2200 किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:59 AM2023-09-06T11:59:12+5:302023-09-06T12:04:42+5:30
आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तरुणीने तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास केला आहे. सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली.
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी राजस्थानमधील अनुपगड येथे पोहोचली आहे. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी तरुणीने तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास केला आहे. सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली. टुरिस्ट व्हिसा घेऊन महिला अनुपगडला पोहोचली आहे. पश्चिम राजस्थानच्या अनुपगड जिल्ह्यात प्रियकराला भेटायला आलेली बांगलादेशी महिला सापडल्यानंतर गुप्तचर यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
रावळा पोलिस स्टेशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर ही बाब उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. ढाका येथील उम्मे हबीबा अशी एक महिला तिच्या देशातून कोलकाता येथे पोहोचली आणि तेथून राजस्थानमधील एका छोट्या गावात राहायला गेली. राजस्थान पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 1 सप्टेंबर रोजी ढाका सोडलं आणि कोलकाता येथे पोहोचली. टुरिस्ट व्हिसावर प्रवास करत असल्याचा दावा केला.
3 सप्टेंबरला ती हावडा एक्स्प्रेसने बिकानेरला पोहोचली. त्यानंतर तिने बिकानेरच्या बसस्थानकावरून बस पकडली आणि अनुपगड जिल्ह्यातील गावात पोहोचली. आयजीपी बिकानेर ओम प्रकाश यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना अलर्ट पाठवण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी महिलेची चौकशी करण्यासाठी विविध सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त चौकशी समिती (जेआयसी) स्थापन करण्याची शिफारस केली आहे.
महिला एका स्थानिक व्यक्तीला, जो सुमारे 28 वर्षांचा आहे तो एका App वर भेटला होता. गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते App वर एकमेकांशी बोलत होते. प्रियकर विवाहित असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्याकडून सुमारे 2000 बांगलादेशी चलन, पासपोर्ट, ढाका ते कोलकाता रेल्वेचे तिकीट आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ती ज्या व्यक्तीला भेटायला आली होती त्याचे नाव रोशन असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांची चौकशी सुरू असल्याचं देखील पोलीस अधिकारी म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.