बांगलादेशच्या शेख हसीना दिल्लीत
By admin | Published: April 8, 2017 12:17 AM2017-04-08T00:17:08+5:302017-04-08T00:17:08+5:30
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी शुक्रवारी येथे आगमन झाले.
नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी शुक्रवारी येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर जाऊ न त्यांचे स्वागत केले. भारत दौऱ्यादरम्यान त्या पंतप्रधान मोदींशी विविध मुद्यांवर चर्चा करतील.
मोदी पंतप्रधान बनल्यानंतर हसीना यांचा हा पहिला भारत दौरा आहे. हसीनांच्या दौऱ्यात दोन्ही देशांत नागरी अणुसहकार्य आणि संरक्षणासह विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रात किमान २५ करार अपेक्षित आहेत. तथापि, तीस्ता पाणीवाटपावर करार होण्याची शक्यता कमी आहे. मोदी आणि हसीना उद्या सविस्तर चर्चा करतील. भारत लष्करी पुरवठ्यासाठी बांगलादेशला ५० कोटी डॉलरचे कर्ज सुविधा देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार तीस्ता करारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही आणि राज्यातील जलसंकटाच्या दृष्टिकोनातून ममता याला तीव्र विरोध करीत आहेत.
दोन्ही देश नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी करतील. त्यामुळे या क्षेत्रात सहकार्य आणखी वाढविता येऊ शकेल. यात भारताद्वारे बांगलादेशात अणुभट्टी उभारण्याचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव श्रीप्रिया रंगनाथन म्हणाल्या की, हा अत्यंत महत्त्वपूर्ण दौरा असेल. आम्हाला आशा आहे की, या दौऱ्यामुळे उभय देशांतील संबंध नवी उंची गाठतील. तीस्ता करारावर त्या म्हणाल्या की, तीस्ता करार विचारविनिमयाच्या पातळीवर आहे. सप्टेंबर २०११ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान बॅनर्जींनी आक्षेप घेतल्याने तीस्ता करारावर स्वाक्षरी होऊ शकली नव्हती.
>सामान्य वाहतूक आणि सेल्फी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वागतासाठी शुक्रवारी इंदिरा
गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले, तेव्हा त्यांच्या
वाहनांच्या ताफ्यासाठी अन्य वाहतूक थांबविण्यात आली नाही. सामान्य वाहतूकव्यवस्थेद्वारे ते विमानतळावर आले. विमानतळावर बांगलादेशाच्या भारतीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांसमवेत सेल्फी काढली.