"1 कोटी सोडा, 10 कोटी दिले तरी मी पतीला सोडणार नाही"; सानियाने योगींकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:51 PM2023-10-03T14:51:57+5:302023-10-03T14:58:51+5:30
बांग्लादेशातून भारतात आलेल्या सानिया अख्तरच्या प्रकरणाला आता वेग आला आहे.
बांग्लादेशातून भारतात आलेल्या सानिया अख्तरच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. याच दरम्यान, सानियाने आजतकशी बोलताना आपली बाजू मांडली आणि पती सौरभकांत तिवारी याने केलेल्या आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले.
सानियाने सांगितलं की, तिच्या कुटुंबीयांनी सौरभकांतवर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती केली नाही. तो बांगलादेशात दोन वर्षे आरामात राहिला. तिला तिच्या पतीसोबत राहायचे आहे आणि तिच्या मुलाला त्याचे हक्क मिळवून द्यायचे आहेत. याशिवाय पतीने केलेले हनीट्रॅपचे आरोप निराधार असल्याचं देखील सानियाने म्हटलं आहे.
त्याने मला कसं प्रपोज केलं, धर्म परिवर्तन करून लग्न कसं केलं याचे सर्व पुरावे त्याच्याकडे आहेत. एक कोटी सोडा... दहा कोटी दिले तरी मी माझ्या पतीला सोडणार नाही. हे मूल सौरभकांत तिवारी याचे असून मी त्याची पत्नी असल्याचे सानियाने स्पष्टपणे सांगितले. हे लग्न कोणत्याही किंमतीत टिकवावे लागेल. जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारत सोडणार नसल्याचे सानियाने सांगितले. तिचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सानियाने मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली आहे.
सौरभकांत तिवारी यानेही या प्रकरणी आपली बाजू मांडली आणि तो म्हणाला की, तो बांग्लादेशच्या एका वीज कंपनीत डीजीएम म्हणून कार्यरत होता. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये सानिया काही कामानिमित्त त्याला भेटायला आली आणि नोकरीच्या बहाण्याने जवळीक वाढवली.
दोघे जवळ आले. याच दरम्यान, सानियाने त्याचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ बनवला. कुटुंबीयांनी त्याच्यावर दबाव टाकला की जर त्याने इस्लाम स्वीकारला नाही आणि सानियाशी लग्न केलं नाही तर ते त्याला बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात पाठवतील. एप्रिलमध्ये दबाव आणि मारहाण करून निकाह करण्यास भाग पाडले. त्याच्याकडून बांग्लादेशात 5 लाख रुपये आणि 50 लाख रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी करण्यात आला. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.