आईची औषधं आणण्यासाठी बांगलादेशी तरुणानं भारतीय हद्दीत प्रवेश केला; BSF नं पकडलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:34 PM2021-09-29T17:34:54+5:302021-09-29T17:36:13+5:30
भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे.
भारताच्यासीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे. बीएसएफच्या जवानांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी महाखोला येथील नदिया जिल्ह्यात सीमावर्ती परिसरात एका बांगलादेशी तरुणाला अवैध पद्धतीनं भारतीय हद्दीत प्रवेश करताना पकडलं होतं. पण चौकशी दरम्यान त्यानं आपल्या आईची औषधं आणण्यासाठी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचं जवानांना लक्षात आलं. त्यानंतर भारतीय जवानांनी संबंधित तरुणावर कोणतीही कारवाई न करता त्याला बांगलादेश गार्ड बॉर्डरच्या (BGB) जवानांकडे सोपवलं आणि मानवतेचं दर्शन घडवलं.
संबंधित तरुणाचं नाव मिथुन मंडल असल्याची माहिती समोर आली असून तो ३० वर्षांचा आहे. त्याच्या वडिलांचं नाव अरब मंडल असं आहे. बांगलादेशातील चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावातील रहिवासी आहे. बीएसएफ जवानांनी तरुणाची चौकशी केली असता त्यानं आपली आई आजारी असून तो सीमेपलिकडे इन्हेलर खरेदी करण्यसाठी आला होता असं सांगितलं.
आईला अस्थमा आणि हृदय विकाराचा त्रास
मिथुन मंडल यानं अटक झाल्यानंतर भारतीय जवानांची हात जोडून माफी मागितली आणि आपल्या आईला अस्थमा आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगितलं. आईला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे आईसाठी इन्हेलर घेण्यासाठी त्यानं सीमा ओलांडली होती. भारतीय जवानांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून या तरुणाला बांगलादेश जवानांकडे सोपविण्यात आलं.