...तर काश्मीरमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे दहशतवादी हल्ले वाढतील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 12:11 PM2018-02-10T12:11:21+5:302018-02-10T12:13:29+5:30
भविष्यात हे लोक दहशतवाद्यांचे आश्रयदाते ठरू शकतात.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांना हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय जवान जखमी झाले असून चार जण जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिक आणि भाजपाचे विधानपरिषदेतील आमदार विक्रम रंधवा यांनी वेगळीच भीती व्यक्त केली. गेल्या काही काळापासून जम्मू परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. त्यांना अटकाव न केल्यास भविष्यात हे लोक दहशतवाद्यांचे आश्रयदाते ठरू शकतात. मी हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. आज सुंजवा लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याशीही याचा संबंध असण्याची शक्यता आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रंधवा यांनी केली.
जम्मू-पठाणकोट महामार्गानजीक असणाऱ्या सुंजवा लष्करी तळावर पावणे पाच वाजता हा हल्ला झाला. लष्करी तळाच्या जवळ पहाटेपासून काही संशयास्पद हालचाली जाणवत होत्या. पहाटे पावणे पाचच्या सुमारास सुंजवा लष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी दहशतवादी जवळच्या रहिवासी इमारतीमध्ये लपून बसले. त्यानंतर भारतीय लष्कराने हा संपूर्ण परिसर खाली करून कारवाईला सुरूवात केली. काही तास दोन्ही दिशेने गोळीबार सुरू होता. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, दहशतवाद्यांची नेमकी संख्या माहिती नसल्यामुळे सध्या लष्कराकडून ड्रोनद्वारे संबंधित परिसराची पाहणी सुरु आहे.
9 फेब्रुवारी 2013 रोजी अफजल गुरूला फाशी दिल्याला यंदा पाच वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी अशाप्रकारच्या हल्ल्याचा इशारा सुरक्षा दलांना दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर दहशतवाद्यांकडून लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 5 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील 50व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता. यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेडस् फेकण्यात आले होते. या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.