कौतुकस्पद! "आईने बांगड्या विकल्या, समाजाचे टोमणे ऐकले"; लेक झाला CRPF मध्ये सब इन्स्पेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:00 PM2023-08-19T12:00:31+5:302023-08-19T12:07:36+5:30
राहुल गवारिया हा त्यांच्या समाजातील एकमेव व्यक्ती आहे जो इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.
राजस्थानमधील धानी गावात बांगड्या विकणाऱ्या महिलेच्या मुलाची केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाची (एसएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) सब इन्स्पेक्टर पद मिळवलं आहे. लेक राहुलच्या या यशामुळे आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही, तर दुसरीकडे लोक आता मेहनती आई आणि मुलगा दोघांचेही भरभरून कौतुक करत आहेत.
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील आदर्श ढूंढा या छोट्याशा गावात राहणाऱ्या राहुल गवारियाने एसएससी सीआरपीएफ सब-इन्स्पेक्टरची परीक्षा दिली होती. अलीकडच्या काळात निकाल जाहीर झाला तेव्हा त्याला खूप आनंद झाला. कारण राहुल गवारिया हा त्यांच्या समाजातील एकमेव व्यक्ती आहे जो इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.
राहुलची आई कमला देवी निरक्षर असून वडील फक्त आठवी पास आहेत. समाजाच्या टोमणे मारूनही पालकांनी राहुलला शिकवले. बाडमेरमधील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान, राहुलने एनसीसीमध्ये प्रवेश केला आणि प्रजासत्ताक दिन शिबिर 2019 मध्ये भाग घेतला आणि जोधपूर ग्रुप कॅडेट्समध्ये सर्वोत्कृष्ट कॅडेट्सचा पुरस्कार देखील जिंकला. यानंतर त्याने सैन्यात भरती होण्याची तयारी सुरू केली.
केवळ बाडमेर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण जोधपूर विभागात राहुल हा आपल्या समाजातील एकमेव व्यक्ती आहे जो CRPF मध्ये सब-इन्स्पेक्टर झाला आहे. आता राहुलच्या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. आपल्या मुलाला शिकवण्यासाठी आई-वडिलांनी कष्ट केले. बांगड्या टोपलीत घेऊन गावोगाव फिरत राहिले. शेवटी शहरात मणिहारीचं छोटेसं दुकान उघडलं.
राहुल गवारिया सांगतो की, "त्यांच्या समाजात मुलं आणि मुली... कोणाला शिकवलं जात नाही, अभ्यासापासून दूर ठेवले जातं. पण माझ्या आई-वडिलांनी मला बांगड्या विकून आणि मजुरी करून शिकवलं. समाजातील लोक त्याला दिवसेंदिवस टोमणे मारत राहिले, तरीही त्याने ही गोष्ट कधीच मनावर घेतली नाही आणि मला शिकवत राहिले."
"आता निकाल लागला आहे, हा निकाल पाहून मला खूप आनंद झाला आहे, पालकही खूप खूश आहेत." राहुलची आई कमला देवी सांगतात की, तिने आपल्या मुलाच्या अभ्यासाबाबत समाजातील लोकांकडून अनेकदा टोमणे ऐकले. पण आता मुलगा अधिकारी झाला आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.