बँक खाती ३0 एप्रिलपूर्वी आधारशी जोडा!
By admin | Published: April 13, 2017 04:15 AM2017-04-13T04:15:25+5:302017-04-13T04:15:25+5:30
जुलै २0१४ ते आॅगस्ट २0१५ या काळात काढण्यात आलेल्या बँक खात्यांची केवायसी पूर्तता, तसेच आधार क्रमांक जोडणी ३0 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने दिले
नवी दिल्ली : जुलै २0१४ ते आॅगस्ट २0१५ या काळात काढण्यात आलेल्या बँक खात्यांची केवायसी पूर्तता, तसेच आधार क्रमांक जोडणी ३0 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाने दिले आहेत. याच कालावधीत विदेशी कर अनुपालन कायद्याचे (एफएटीसीए) पालन करीत असल्याबाबत स्वप्रमाणीकरण करण्याच्या सूचनाही विभागाने दिल्या आहेत.
केवायसी, आधार जोडणी आणि एफटीसीए प्रमाणीकरण विहित मुदतीत न केल्यास बँका आणि वित्तीय संस्था संबंधित खाती गोठवू शकतात. संबंधित तपशील सादर केल्यानंतरच संबंधित खाती पुन्हा सुरू होऊ शकतील. या तरतुदी एफएटीसीए नियमांतर्गत येणाऱ्या सर्व खात्यांना लागू आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या वतीने बँका आणि वित्तीय संस्थांना या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. १ जुलै २0१४ ते ३१ आॅगस्ट २0१५ या कालावधी खाती उघडणाऱ्या सर्व व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी हे आदेश बंधनकारक आहेत. त्यानुसार, भारत आणि अमेरिकेने स्वाक्षरी केलेल्या विदेशी खाते कर अनुपालन कायद्याशी संबंधित तरतुदींचे पालन करीत असल्याचे स्वप्रमाणपत्र बँका खातेदारांकडून घेतील.
एफएटीसीए कायद्यांतर्गत जुलै २0१५ मध्ये भारत आणि अमेरिकेने कर विषयक माहिती सामायिक करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कर चुकवेगिरीची माहिती एकमेकांना आपोआप मिळावी, हा या कराराचा उद्देश आहे.
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३0 एप्रिलपूर्वी स्वप्रमाणीकरण न केल्यास, बँक खाते बंद करण्यात येईल. संबंधित माहितीचा तपशील प्राप्त होईपर्यंत, खातेदार या खात्यावरून कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू शकणार नाहीत. बँक खात्यांप्रमाणेच विमा आणि शेअर बाजारातील खात्यांनाही हा नियम लागू आहे.