बाके बिहारी मंदिरात बँकेच्या कर्मचाऱ्याने केली चोरी; अंतर्वस्त्रांमध्ये लपवले नोटांचे बंडल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:52 IST2025-04-07T13:48:36+5:302025-04-07T13:52:21+5:30
मथुरेतल्या जगप्रसिद्ध मंदिरात चोरी करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

बाके बिहारी मंदिरात बँकेच्या कर्मचाऱ्याने केली चोरी; अंतर्वस्त्रांमध्ये लपवले नोटांचे बंडल
Banke Bihari Temple: उत्तर प्रदेशातील मथुरेत श्री ठाकूर बाके बिहारी मंदिरातून चोरीची घटना उघडकीस आली आहे. जगप्रसिद्ध बाके बिहारी मंदिरातील दानपेटीमधून लाखोंच्या चोरी झाली. बांके बिहारी मंदिरातील दानपेट्यांमधून सुमारे १० लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी एका बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज पाहून बँक कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्याचे समोर आलं. बँक कर्मचाऱ्याच्या घराची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. या घटनेमुळे भाविकांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झालं आहे.
मथुरेतल्या वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारी मंदिरात भाविक मोकळ्या मनाने देणग्या देतात. हे पैसे मोजण्यासाठी आलेल्या एका बँक कर्मचाऱ्याचे मनात वाईट विचार आला आणि त्याने पैशांची चोरी केली. त्याची चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो पकडला गेला. बँक कर्मचाऱ्याकडून ९.५० लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. मंदिराच्या व्यवस्थापकाने बँक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पैसे पाहून माझे मनसुबे बिघडले. त्यामुळे मी चोरी केली, असं बँकेचे कर्मचाऱ्याने सांगितले.
बांके बिहारी मंदिरात १६ दानपेट्या आहेत. दर महिन्याला या दानपेट्या बँकेचे कर्मचारी न्यायालय नियुक्त अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली उघडतात. गेल्या आठवड्यात देणगीची रक्कम मोजण्याचे काम तीन दिवस सुरू होते. शनिवारी ५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या नियंत्रण कक्षातल्या अधिकाऱ्यांना बँक कर्मचाऱ्याने कपड्यात काहीतरी लपवल्याचा संशय आला. याची माहिती मंदिराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यानंतर बँक कर्मचाऱ्याची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान, बँक कर्मचाऱ्याकडे १ लाख ३८ हजार रुपये सापडले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, बऱ्याच दिवसांपासून मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारत असल्याचे समोर आलं.
त्यानंतर पोलिसांनी बँक कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचले. घरातून पोलिसांनी मंदिरातून चोरी केलेले आठ लाख रुपये जप्त केले. आरोपी बँक कर्मचारी अभिनव हा कॅनरा बँकेत फील्ड ऑफिसर म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव दानपेटीतून चोरलेल्या नोटा त्याच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. झडती दरम्यान त्याच्याकडे १ लाख २८ हजार ६०० रुपये सापडले. त्याच्या अंतर्वस्त्रातून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांची तीन बंडलं जप्त करण्यात आली. ५०० रुपयांच्या २१८ आणि २०० रुपयांच्या ९८ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.