पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:57 IST2025-02-15T15:10:52+5:302025-02-15T15:57:15+5:30

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात पतीने आपल्या पत्नीच्या धार्मिकतेमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहेत.

bank officer files divorce in bhopal family court wife goes to mahakumbh mela | पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?  

पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?  

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी बरेच भाविक दाखल होत आहेत. मात्र, एका पतीला त्याची पत्नी महाकुंभमेळ्यात गेल्याने इतका संताप आला की त्याने थेट न्यायालयातघटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, हे एकच प्रकरण नाही तर, पत्नीची अध्यात्माकडे जास्त ओढ असल्याचे कारण देत घटस्फोटासाठी अशी तीन प्रकरणे भोपाळ कुटुंब न्यायालयात पोहोचली आहेत.

भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात पतीने आपल्या पत्नीच्या धार्मिकतेमुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या एका महिन्यात अशी तीन प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये, पत्नींचा धर्माकडे वाढता कल घटस्फोटाचे कारण बनत आहे. एका प्रकरणात बँक अधिकाऱ्याने आपल्या पत्नीच्या महाकुंभाला जाण्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 

माझा नकार असतानाही पत्नी आपल्या मित्रांसोबत धार्मिक यात्रांना जाते, असे बँक अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, पत्नी गेल्या महिन्यात वृंदावनहून परतली होती आणि तेव्हापासून तिने सिंदूर आणि बिंदीऐवजी चंदनाचा टिळक लावण्यास सुरुवात केली आहे. यानंतर ती महाकुंभमेळ्यालाही गेली आणि परतल्यानंतर तिने रुद्राक्षाची माळ घालायला सुरुवात केली. पत्नीच्या बदलत्या वागण्यामुळे अस्वस्थ वाटत होते, असेही बँक अधिकाऱ्याने सांगितले. 

नोकरी मिळाली नाही तर पूजा करते
दुसऱ्या एका घटस्फोटातील प्रकरणात, पतीने सांगितले की, पूर्वी त्याची पत्नी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, पण नोकरी न मिळाल्याने तिने पूजा पाठ करायला सुरुवात केली. यश मिळाले नाही, पण उपासनेची प्रथा वाढतच गेली. आता, पत्नी धार्मिक गुरूंनी सुचवलेल्या विधी करण्यासाठी मंदिरात तासनतास घालवते आणि घरात त्यांचे व्हिडिओ देखील प्ले करते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले आहेत.

जोडप्यांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न
वरील दोन्ही प्रकरणांमध्ये आणि आणखी एका प्रकरणात पत्नींची वाढती धार्मिकता घटस्फोटासाठी कारण बनली आहे. अशा प्रकरणांमध्ये, भोपाळ कुटुंब न्यायालयाचे समुपदेशक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे नाते टिकवण्याचे प्रयत्न करत आहेत. समुपदेशनाद्वारे, या जोडप्यांना एकमेकांच्या विचारांचा आणि धार्मिक प्रवृत्तीचा आदर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

Web Title: bank officer files divorce in bhopal family court wife goes to mahakumbh mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.