खातेधारकांच्या ऑनलाइन फसवणुकीला बँकच जबाबदार; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय
By जयदीप दाभोळकर | Published: January 7, 2021 05:21 PM2021-01-07T17:21:45+5:302021-01-07T17:24:36+5:30
आयोगाकडून संबंधित ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे बँकेला आदेश.
एकीकडे केंद्र सरकारद्वारे डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यास सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन हॅकिंग आणि फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेकदा ग्राहकांकडून अशा फसवणुकीची तक्रारही केली जात नाही. त्यामुळे खातेधारकांच्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम त्यांना परत करणं शक्य बँकांनाही शक्य होत नाही.
ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून ग्राहकांसाठी मोठी आणि चांगली बातमी आली आहे. जर हॅकरनं ग्राहकांच्या खात्यातून ऑनलाइन फसवणुकीद्वारे अथवा हॅकिंगद्वारे पैसे काढल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही बँकेची असणार आहे, असं ग्राहक आयोगाकडून सांगण्यात आलं. १२ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना आयोगानं ऑनलाइन फसवणुकीसाठी बँकेला जबाबदार ठरवलं आहे. हॅकरनं बँकेतून रक्कम चोरल्याची तक्रार एका महिलेनं बँकेला केली होती.
या घटनेसाठी ग्राहकानं बँकेची इलेक्ट्रॉनिक सिस्टम जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. संबंधित महिला ग्राहकाचं क्रेडिट कार्ड चोरी झाल्याचा कोणताही पुरावा बँकेनं दाखवला नाही, असं आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. तसंच संबंधित महिला ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत.
३ लाखांची नुकसान भरपाई द्या
ठाणे शहरात राहणाऱ्या जेसना जोस यांनी एका खासगी बँकेकडून प्रीपेड फॉरेक्स कार्ड घेतलं होतं. २००८ मध्ये त्यांच्या खात्यातून २९ वेळा ट्रान्झॅक्शन करून ३ लाख रूपये चोरण्यात आले होते. याची तक्रार जेसना यांनी ग्राहक आयोगात केली होती. यानंतर राष्ट्रीय ग्राहक आयोगानं ग्राहकाचं क्रेडिट कार्ड चोरीला गेल्याचा बँकेचा दावा नाकारला आणि जेसना यांना ३ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. याव्यतिरिक्त त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल आणि कायदेशीर कारवाईसाठी लागलेल्या खर्चाबद्दल ८० हजार रूपये अतिरिक्त देण्याचे आदेशही दिले.