अरे बापरे! UCO बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात अचानक आले 820 कोटी; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 01:32 PM2023-12-06T13:32:02+5:302023-12-06T13:33:54+5:30
सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तपासादरम्यान, मोबाईल फोन, लॅपटॉप, कम्प्युटर सिस्टम, ईमेल आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
UCO बँकेच्या 41,000 खातेदारांच्या खात्यात 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान अचानक 820 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने FIR नोंदवला आहे. या प्रकरणात, एकीकडे ही रक्कम खात्यांमध्ये जमा होत असताना, दुसरीकडे ज्या खात्यांमधून ही रक्कम मूळत: हस्तांतरित करण्यात आली होती, त्या खात्यांमधून कोणतेही 'डेबिट' नोंदवले गेले नाही. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
मंगळवारपर्यंत सुरू असलेल्या या छाप्यात अनेक शहरांमध्ये 13 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS) द्वारे 8.53 लाखांहून अधिक व्यवहार झाले, ज्यामध्ये 820 कोटी रुपये खासगी बँकांच्या 14,000 खातेदारांकडून UCO बँकेच्या खातेधारकांच्या 41,000 खात्यांवर गेले.
अधिकारी म्हणाले की, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ बँक खात्यांमधून कोणतीही रक्कम 'डेबिट' झाली नाही आणि अनेक खातेदारांच्या खात्यातील अचानक रक्कम काढली. अधिकार्यांनी सांगितलं की, युको बँकेच्या तक्रारीवरून बँकेत काम करणारे दोन सहाय्यक अभियंता आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत सुमारे 820 कोटी रुपयांचे "संशयास्पद" IMPS व्यवहार झाल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, तपासादरम्यान, मोबाईल फोन, लॅपटॉप, कम्प्युटर सिस्टम, ईमेल आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
अधिकारी म्हणाले, असा आरोप आहे की 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान सात खासगी बँकांच्या 14,000 खातेदारांकडून IMPS द्वारे व्यवहारांशी संबंधित रक्कम IMPS चॅनलद्वारे UCO बँकेच्या 41,000 खातेदारांच्या खात्यात पोहोचली.
"या जटिल नेटवर्कमध्ये 8,53,049 व्यवहारांचा समावेश असल्याचा आरोप आहे आणि हे व्यवहार UCO बँकेच्या खातेदारांच्या नोंदींमध्ये चुकीच्या पद्धतीने नोंदवले गेले आहेत, तर मूळ बँकांनी व्यवहार अयशस्वी म्हणून नोंदवले आहेत" असं प्रवक्त्याने सांगितले. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक खातेदारांनी युको बँकेतून विविध बँकिंग माध्यमातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.