रस्तेबांधणीसाठी कर्ज देण्यास बँका नाखुश : नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:45 AM2018-09-20T00:45:04+5:302018-09-20T00:45:58+5:30
देशातील रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी कंत्राटदारांना कर्जे देण्यात बँकांनी हात काहीसा आखडता घेतल्याने हे प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे.
नवी दिल्ली : देशातील रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी कंत्राटदारांना कर्जे देण्यात बँकांनी हात काहीसा आखडता घेतल्याने हे प्रकल्प रेंगाळण्याची भीती आहे. ही माहिती दस्तुरखुद्द केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
देशात २०२२ सालापर्यंत ८४ हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र, रस्ते बांधणीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना कर्जे देण्यात बँकांना जोखीम वाटते.
सरतेशेवटी मंगळवारी एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्यावरच असे आवाहन करण्याची वेळ आली की, देशाची अर्थव्यवस्था, उद्योग, गुंतवणूक, कंत्राटदारांची स्थिती, नव्या नोकºया निर्माण होण्याची शक्यता अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून रस्ते प्रकल्पांच्या बांधणीसाठी बँकांनी अग्रक्रमाने कर्जे द्यायला हवीत. काही ठिकाणी अशी कर्जे दिली जात आहेत; पण ती देण्याची प्रक्रिया खूपच धीम्यागतीने सुरू आहे, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी दिली.
कर्जे देण्याबाबतचा निर्णय चुकला, तर सध्या जशी अनेक प्रकरणांची चौकशी सुरू आहे, तशा चौकशीला आपणासही सामोरे जावे लागेल, अशी भीती बँकांना व अधिकाºयांना वाटत आहे. त्यामुळे जोखीम घेण्यास बँका पटकन तयार होत नाहीत, असे स्टेट बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष राजेशकुमार यांनी मे महिन्यात सांगितले होते.
नॅशनल हायवेला २५ हजार कोटी
नॅशनल हाय-वे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) एसबीआयकडून २५ हजार कोटींचे कर्ज रस्ते बांधणी प्रकल्पांसाठी घेतले आहे. अशा प्रकल्पांसाठी कर्जे देण्यात कोणतीही जोखीम नाही, हे बँकांना समजावून सांगितले पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.