२ हजार कोटी भांडवलाच्या बँक संस्थापकाचा आत्महत्येचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:38 AM2019-06-12T08:38:47+5:302019-06-12T08:38:54+5:30
बँकेचे संस्थापक मोहम्मद मन्सूर खान यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर झळकताच घाबरलेल्या ठेवीदार, खातेदारांनी बँकेच्या कार्यालयापाशी गर्दी केली. दोन हजार कोटी रुपये इतके या बँकेचे भागभांडवल आहे.
बंगळुरू : राजकारणी व नोकरशहांना पैसे चारून थकल्याने मी आत्महत्या करीत आहे, असा इशारा देणारी आय मॉनिटरी अॅडव्हायझरी (आयएमए) या बँकेचे संस्थापक मोहम्मद मन्सूर खान यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर झळकताच घाबरलेल्या ठेवीदार, खातेदारांनी बँकेच्या कार्यालयापाशी गर्दी केली. दोन हजार कोटी रुपये इतके या बँकेचे भागभांडवल आहे.
बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांना उद्देशून ही ध्वनिफीत बनविण्यात आली होती. काँग्रेसचे आमदार रोशन बेग घेतलेले ४०० कोटी रुपये ते परत देण्यास तयार नाहीत. आपल्या जीवाला धोका आहे, असा दावा मोहम्मद मन्सूर खान यांनी या ध्वनिफीतीत केला आहे. ही ध्वनिफीत ऐकून संतापलेल्या ठेवीदार, खातेधारकांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मोहम्मद मन्सूर खान यांनी आत्महत्या केल्याचा पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.
आयएमए बँकेची २००६ साली स्थापना झाली. गुंतवणुकीवर दरमहा १४ ते १८ टक्के व्याज देण्याचे बँकेने जाहीर केल्याने लोकांनी गुंतवणूक केली. बहुतांश ठेवीदार मुस्लिम आहेत. त्यांच्याकडून जमा झालेले दोन हजार कोटी रुपये बँकेने विविध क्षेत्रांत गुंतविले आहेत.
खान यांनी आपल्याला १.३ कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार त्यांचे बांधकाम व्यवसायातील भागीदार मोहम्मद खालिद अहमद यांनी पोलिसांत केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोहम्मद यांची ही ध्वनिफीत प्रसारित झाली.
>विरोधकांचे कारस्थान -आर. रोशन बेग
खान यांच्या ध्वनिफितीतील आरोपांचा इन्कार करताना रोशन बेग म्हणाले की, आयएमए बँकेशी मी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. माझ्याविरोधातील काहींनी कारस्थान रचून ही ध्वनिफीत तयार केली आहे. आयएमए बँक व्यवहारांमध्ये दुसऱ्यांदा माझे नाव गोवण्यात आले आहे. याप्रकरणी ते सायबर पोलिसांत तक्रार करणार आहेत.