बँकांचे व्यवहार ठप्प
By Admin | Published: July 30, 2016 05:14 AM2016-07-30T05:14:46+5:302016-07-30T05:14:46+5:30
सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या संपावर गेल्यामुळे शुक्रवारी देशभरातील ८0 हजार बँक शाखांतील व्यवहार ठप्प झाले. सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये
नवी दिल्ली : सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी एक दिवसाच्या संपावर गेल्यामुळे शुक्रवारी देशभरातील ८0 हजार बँक शाखांतील व्यवहार ठप्प झाले. सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला आहे.
आयसीआयसीआय बँकेसह अन्य खाजगी क्षेत्रांतील बँका मात्र नेहमीप्रमाणे सुरू होत्या. एसबीआयसह सर्व सरकारी मालकीच्या बँकांनी या संपाची कल्पना ग्राहकांना आधीच दिली होती. त्यामुळे या बँकांच्या कार्यालयात शुकशुकाट दिसून
आला. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली आजचा संप करण्यात आला.
सुमारे ८ लाख कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले होते. संपामुळे धनादेश क्लीअरन्सची सुविधा पूर्णत: ठप्प झाल्याचे दिसून आले. याशिवाय संबंधित शाखांतील पैसे काढणे आणि भरण्याचे व्यवहारही पूर्णत: बंद होते. आॅल इंडिया स्टेट बँक आॅफिसर्स फेडरेशन आणि आॅल इंडिया स्टेट बँक आॅफ इंडिया स्टाफ फेडरेश या एसबीआयच्या प्रमुख कर्मचारी-अधिकारी संघटना संपात सहभागी होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
संपामुळे १५ हजार कोटींच्या व्यवहारांवर परिणाम
सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशभरातील सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतात, असे प्रतिपादन औद्योगिक संघटना असोचेमने केले आहे.
असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी सांगितले की, सरकारी बँकांचा नफा खाजगी बँकांच्या तुलनेत आधीच कमी आहे. संपामुळे त्यांना आणखी नुकसान होऊ शकते. या बँकांच्या कामकाजात सुधारणा आणण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांची गरज आहे.