तीन वर्षात बँकांचे १.७६ लाख कोटी रुपये बुडाले, नोटबंदीनंतर बँकांची वाताहत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:58 PM2019-10-10T14:58:02+5:302019-10-10T14:58:58+5:30
नोटबंदीनंतर बँकांकडून कोट्यवधींची कर्ज माफ
नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षात भारतीय बँकांनी तब्बल १.७६ लाख कोटी रुपये गमावले आहेत. शंभर कोटींपेक्षा अधिकचं कर्ज बुडवणाऱ्या ४१६ खातेधारकांची माहिती नुकतीच समोर आली आहे. या व्यक्तींनी बुडवलेल्या कर्जाची सरासरी रक्कम ४२४ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बँकांनी दिलेलं कर्ज बुडित खात्यात गेलं आहे.
मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या व्यक्तींचा आकडा पहिल्यांदाच समोर आला आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक रक्कम बुडवणाऱ्या खातेधारकांची माहिती जाहीर करण्याच्या सूचना आरबीआयनं बँकांना दिल्या होत्या. त्यानंतर याबद्दलची आकडेवारी 'सीएनएन-न्यूज१८'नं माहिती अधिकारातून समोर आणली आहे. २०१४-१५ पासून सरकारी आणि खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी करण्यात आल्याची आकडेवारी यात आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत देशातील शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी एकूण २.१७ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे.
३१ मार्च २०१६ पर्यंत बँकांनी ६९,९७६ कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं. यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटबंदीनंतरच्या दोन वर्षांमध्ये माफ करण्यात आलेल्या कर्जाचा आकडा थेट १,२७,७९७ कोटींवर जाऊन पोहोचला. म्हणजेच नोटाबंदीनंतर बँकांचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज तब्बल ८३ टक्क्यांनी वाढलं. यानंतरही बँकांचं कर्ज बुडवणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. त्यामुळे बुडित खात्यात गेलेली रक्कम १.२७ लाख कोटी रुपयांवरुन २.१७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली.