विजय मल्ल्यांच्या ४ हजार कोटींच्या प्रस्तावाला बँकांचा विरोध
By admin | Published: April 4, 2016 01:51 PM2016-04-04T13:51:56+5:302016-04-04T13:51:56+5:30
बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेल्या प्रस्तावाला बँका विरोध करणार असल्याची माहिती मिळाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ४ - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेल्या प्रस्तावाला बँका विरोध करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आपल्या उद्योगसमुहातील कंपन्यांकडे थकित असलेल्या एकूण सुमारे ९००० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ४००० कोटी रुपयांची परतफेड येत्या सप्टेंबरपर्यंत करण्याचा प्रस्ताव वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.
विजय मल्ल्यांचा हा प्रस्ताव बँकांच्या पसंतीस पडला नसून सर्वोच्च न्यायालयात विरोध करणार असल्याची माहिती बँकांशी संबंधित काही लोकांनी दिली आहे. विजय मल्ल्यांनी ठेवलेल्या प्रस्तावावर बँकांना ७ एप्रिलला न्यायालयात आपली भुमिका मांडायची आहे. 'कमीत कमी ४९०० कोटी भरावेत अशी बँकांची मागणी आहे. तसंच व्याजाच्या रकमेची मागणीदेखील समोर ठेवण्यात येणार आहे' अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
'महत्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे लगेच मिळणार आहेत का याची माहिती द्यावी, आम्हाला रिकव्हरी एजंट म्हणून काम करायचं नाही आहे. मल्ल्यांनी जरी प्रस्ताव ठेवला असला तरी इतकी रक्कम कशी उभारणार आहेत', याबद्दल आम्हाला शंका असल्याचंही बँकांनी म्हंटलं आहे.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्चला विजय मल्ल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.