बँकांची थकीत कर्जे झाली कमी; पण आर्थिक घोटाळे मात्र वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:47 AM2020-02-05T03:47:00+5:302020-02-05T03:47:05+5:30
तीन वर्षांत वाढले फसवणुकीचे प्रकार
नवी दिल्ली : वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण कमी झाले असून, ३० सप्टेंबरअखेर या बँकांच्या थकीत कर्जांची रक्कम ७.२७ लाख रुपये आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
शेड्युल्ड व्यापारी बँका तसेच वित्तीय संस्थांमध्ये तब्बल १ लाख १३ हजार ३७४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले असल्याची माहिती आहे, असेही अनुराग ठाकूर यांनी नमूद केले. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी बँकांनी जोरदार मोहीम राबवली असून, नादारी व दिवाळखोरी कायद्यामुळे कर्जांच्या वसुलीला वेग आला आहे, असा दावाही त्यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात केला.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ३१ मार्च २0१५ अखेर थकीत कर्जे २,७९,०१६ कोटी रुपये इतकी होती. ती थकीत कर्जांची रक्कम पुढील वर्षी, ३१ मार्च २०१७ पर्यंत ६,८४,७३२ कोटी रुपयांवर गेली आणि ३१ मार्च २०१८ अखेर हीच रक्कम ८,९५,६०१ कोटींवर गेली, ही माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
ठाकूर म्हणाले की, ३० सप्टेंबर २०१९ अखेर ही कर्जे ७ लाख २७ हजार २९६ कोटी रुपयांवर आली आहेत. म्हणजेच थकीत कर्जांची रक्कम १ लाख ६८ हजार ३0५ कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
शेड्युल्ड व्यापारी बँका आणि वित्तीय संस्था यांमध्ये मात्र घोटाळे वाढले आहेत, असे सांगून ते म्हणाले की, हॅकिंग, सायबर हल्ले, डाटा चोरी आणि बनावट कर्जे यांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यातून हे घोटाळे झाले आहेत आणि अनेक खातेदारांची फसवणूकही झाली आहे. गेल्या तीन वर्षांत अशा घोटाळ्यांची संख्या आणि त्यातील रक्कम यात वाढ होत आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या माहितीतून स्पष्ट होते.