बँकांनी विश्वासार्हता वाढवावी; सहकारमंत्री अमित शाह यांचे आवाहन; स्वत:ला अद्ययावत करा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 07:48 AM2024-03-03T07:48:52+5:302024-03-03T07:49:22+5:30
सहकार आंदोलन सव्वाशे वर्षे जुने आहे. विविध मंत्रालयांशी तुकड्यांनी जोडलेल्या या क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करून क्षेत्राला नवसंजीवनी दिली.
नवी दिल्ली : अर्बन को-ऑप. बँकांनी स्पर्धेत टिकून आपली विश्वासार्हता वाढविण्यासाठी पळ न काढता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःला अद्ययावत करावे, असे आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी येथे केले.
देशातील पंधराशे बँकांचा समूह, अकरा हजार शाखा, सुमारे साडेपाच लाख कोटींच्या ठेवी व साडेतीन लाख कोटींचे ऋण देणाऱ्या शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला सशक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या संरक्षक संस्थेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
सहकार क्षेत्राला मिळेल मानाचे स्थान
सहकार आंदोलन सव्वाशे वर्षे जुने आहे. विविध मंत्रालयांशी तुकड्यांनी जोडलेल्या या क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करून क्षेत्राला नवसंजीवनी दिली. सरकारी व्यवस्थेच्या समर्थनाने सहकार क्षेत्र वेगाने वाटचाल करून अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान प्रस्थापित करेल, असा त्यांनी व्यक्त केला.