बंदी घातलेले चिनी ॲप मागील दाराने भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:05 AM2021-09-09T06:05:18+5:302021-09-09T06:06:13+5:30
वुई चॅट, बायडू यासारख्या अन्य चिनी बनावटीच्या ॲपमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे असे कारण देत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनबरोबरच्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे चीनला धडा शिकविण्यासाठी अन्य पावले उचलण्याबरोबरच त्या देशाने बनविलेल्या टिकटॉकसारख्या विविध ॲपवर भारताने बंदी घातली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून बंदी घातलेल्या चिनी ॲपनी तांत्रिक गोष्टींचा गैरफायदा घेत मागील दाराने भारतात पुन्हा प्रवेश मिळविला आहे.
वुई चॅट, बायडू यासारख्या अन्य चिनी बनावटीच्या ॲपमुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे असे कारण देत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. चिनी ॲप त्यांच्या हाती असलेल्या माहितीचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारींवरून केंद्र सरकारने २६७ चिनी ॲपवर बंदी घातली; मात्र या ॲपनी आपला तोंडवळा बदलून पुन्हा भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. टिकी हे ॲप सिंगापूरच्या बिगो टेक्नॉलॉजीज या कंपनीचे असले तरी तिची मूळ कंपनी जॉय ही चीनमधील असून तिची नॅसडॅकमध्ये नोंदणी झाली आहे. बिगो लाइव्ह या ॲपच्या मागेही बिगो ही चिनी कंपनी आहे. लिकी या ॲपचा कोड बदलण्याचेही कष्ट चीनने घेतलेले नाही.
भारतीय ॲपला प्रतिसाद
भारतातील चिंगारी या ॲपची नोव्हेंबर २०१८मध्ये सुरुवात झाली. चिनी ॲपवर बंदी घालण्याआधी चिंगारीचे ३५ लाख वापरकर्ते होते. आता ही संख्या ७ कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आहे.