धक्कादायक! श्राद्धाच्या जेवणातून 100 जणांना विषबाधा; 50 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 01:20 PM2022-09-18T13:20:53+5:302022-09-18T13:22:11+5:30
एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात शनिवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने जवळपास 100 जणांची प्रकृती खालावली. त्यापैकी 50 जणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारीही रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी रुग्णांची प्रकृती जाणून घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांसवाडा शहरातील नया गावाजवळील पनियाला गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. श्राद्धानिमित्त एका कुटुंबाने जेवण ठेवलं होतं. या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक लोक जमले होते. तेथे अन्नातून विषबाधा झाल्याने अन्न खाणाऱ्या लोकांची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांना जिल्हा मुख्यालयात असलेल्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
50 हून अधिक जण रुग्णालयात दाखल
डॉ. जिग्नेश पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी 200 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यापैकी सुमारे 100 जणांना त्रास झाला. 50 हून अधिक जणांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातही एकाचवेळी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाल्याने भीतीचे वातावरण होते. माहिती मिळताच जिल्हाधिकार्यांसह इतर वरिष्ठ अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
जेवल्यानंतर लोकांना उलट्या आणि जुलाब
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यानंतर लगेचच लोकांना उलट्या आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. एकामागून एक लोक आजारी पडू लागले. त्यानंतर लोकांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत लोकांना रुग्णालयात आणण्यात येत होतं. हे पाहता रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय अधिकारी तेथेच उभे होते. त्याचवेळी परिस्थिती पाहता अतिरिक्त कर्मचारीही पाचारण करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.