गोव्यातील बार: स्मृती इराणींच्या अडचणींत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:50 AM2022-07-28T06:50:07+5:302022-07-28T06:50:34+5:30
बारच्या निर्माणासाठी परवानगी नव्हती
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुलीच्या गोव्यातील कॅफेच्या प्रकरणात महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आसगाव ग्रामपंचायतने माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी सिली सोल्स कॅफे व बार चालवला जात आहे, त्याच्या कोणत्याही निर्माणाची किंवा दुरुस्तीची परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सचिवांनी गोव्याचे एक वकील एरेस रोड्रिग्स यांना आरटीआयअंतर्गत पाठवलेल्या पत्रात (२०२२-२३/९४४) म्हटले आहे की, आसगाव ग्रामच्या घर क्रमांक ४२५साठी २०१९पासून आतापर्यंत अँथनी डीगामा किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्माण किंवा दुरुस्तीसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही. या भूखंडावर सिली सोल्स कॅफे व बार चालवला जातो. यासाठी गोवा सरकारकडून अँथोनी डीगामाने लायसन्स घेतले आहे. अँथोनीचा २ वर्षांपूर्वी मृत्यू झाला.
काँग्रेसचे आरोप काय?
काँग्रेसने आरोप केला आहे की, हा कॅफे स्मृती इराणी यांची मुलगी जोईस चालविते. तर इराणींचा दावा आहे की, त्यांची मुलगी केवळ १८ वर्षांची आहे व सध्या महाविद्यालयात शिकते आहे. तिचा या कॅफेशी किंवा बारशी काहीही संबंध नाही. तथापि, स्मृती इराणी यांच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट समोर आल्या आहेत, ज्यात त्यांनी मुलीला उद्यमी म्हटले आहे.
या प्रकरणात गोवा सरकारने कॅफेला नोटीस दिली आहे. परंतु आसगाव ग्रामपंचायतच्या स्पष्टीकरणामुळे या कॅफेचे निर्माण अवैध रूपाने करण्यात आले होते व त्याचे लायसन्सही अवैध आहे, ही बाब समोर आली आहे.