लग्नाच्या विधी सुरू असताना वारंवार वधूच्या रुममध्ये जात होता नवरदेव; बापानं कानशिलात लगावली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:25 PM2023-01-28T12:25:26+5:302023-01-28T12:26:25+5:30
लग्नाच्या दिवशी विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे.
चित्रकूट-
लग्नाच्या दिवशी विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याचं झालं असं की नवरदेव वधूच्या खोलीत वारंवार जात असल्याचं पाहून नाराज झालेल्या वरबापानं आपल्या मुलाच्या कानशिलात लगावली. मग नवरदेवानंही सर्वांसमोर आपल्याच बापावर हात उगारला. या घटनेनं संतापलेल्या वधूनं लग्नास नकार दिला आणि लग्न सोहळा काही होऊ शकला नाही.
उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील शिवरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. येथील गावातील एका मुलीचा विवाह कानपूरच्या बर्रा येथील रहिवासी असलेल्या तरुणासोबत निश्चित झाला होता. मोठ्या थाटामाटात नवरदेवाची वरात वधूच्या घरी पोहोचली. सारंकाही आनंदात आणि सुरळीत सुरू होतं. पण वरमालाच्या विधीवेळी वधूचं सौंदर्य पाहून नवरदेवाला काही राहावेना. तो वारंवार वधूच्या खोलीत जाऊ लागला.
खरंतर नवरदेवाला कल्पना होती की त्यांच्या कुटुंबात लग्नाच्या ४-५ दिवसांनंतरच वधूला तिच्या माहेरी पाठवलं जातं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा वधू सासरी येते. पण नवरदेवाला ही गोष्ट काही मान्य नव्हती. तो लग्नाचे विधी सुरू असतानाच वारंवार वधूच्या खोलीत जात होता. तो वधूला वारंवार समजावण्याचा आणि सासरीच राहण्याची गळ घालत होता.
नवरदेवाला वडिलांनी लगावली थप्पड
लग्नाचे विधी सुरू असताना असं वारंवार वधूच्या खोलीत जाणं नवरदेवाच्या वडिलांना काही रुचलं नाही आणि ते चांगलेच संतापले. त्यांनी भर मंडपात आपल्याच मुलाच्या कानशिलात लगावली. यानंतर नवरदेवालाही राग अनावर झाला आणि आपल्याच वडिलांवर त्यानं हात उगारला. हे पाहून वधूला जबर धक्का बसला आणि तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिनं या कुटुंबाची सून होण्यास नकार दिला.
वर्षभर माहेरी जाऊ देणार नाही
नवरदेव आपल्या जवळ येऊन वारंवार सांगत होता की लग्नानंतर वर्षभर माहेरी जाऊ देणार नाही. तुला सासरीच राहून शिक्षण पूर्ण करावं लागेल असा तगादा लावत होता, असा आरोप वधूनं केला आहे. नवरदेवाच्या या तगाद्यामुळे आधीच वधू वैतागली होती. त्यात थप्पड मारण्याच्या घटनेनं तिनं लग्नच मोडलं आणि वरात माघारी पाठवली.