बराक ओबामा यांचे भारतात आगमन
By admin | Published: January 25, 2015 10:47 AM2015-01-25T10:47:09+5:302015-01-25T10:47:28+5:30
तीन दिवसीय भारत दौ-याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीतील विमानतळावर आगमन झाले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - तीन दिवसीय भारत दौ-याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीतील विमानतळावर आगमन झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिल्ली विमानतळावर जाऊन ओबामांचे स्वागत केले. ओबामा यांच्यासोबत त्यांची पत्नी मिशेल यादेखील भारतात आल्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे रविवारपासून भारत दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिष्टाचार बाजूला ठेवून ओबामांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर आले. सकाळी पावणे दहाच्या सुमारास ओबामा यांचे एअरफोर्स वन हे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर उतरले. यानंतर मोदींनी ओबामा आणि त्यांचे पत्नी मिशेल यांचे स्वागत केले. यानंतर ओबामा त्यांच्या पत्नीसह दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्यच्या दिशेने रवाना झाले.
दुपारी बारा वाजता ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले जाईल. यानंतर ओबामा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी राजघाट येथे जातील. तिथून ओबामा आणि मोदी यांची हैद्राबाद हाऊसमध्ये बैठक होईल. भोजनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अणूकरारावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत. संध्याकाळी उशीरा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ओबामांची भेट घेतील. तसेेच ओबामा यांच्यासाठी राष्ट्रपतींनी डिनरचे आयोजन केले आहे. उद्या सकाळी ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.