बारामती, माढा... तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारताेफा आज थंडावणार; १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 07:53 AM2024-05-05T07:53:13+5:302024-05-05T07:53:29+5:30
Lok sabha Election : प्रचारासाठी शेवटचा रविवार मिळत असल्याने उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/मुंबई : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारासाठी शेवटचा रविवार मिळत असल्याने उमेदवारांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांसह १२ राज्यांतील ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात गुजरातमधील सर्व २६ जागांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधक लढत ही बारामतीत होत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय सांगलीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धवसेनेत बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. कोल्हापुरातही वारसाहक्कावरून राजकीय फैरी झडल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज ठाकरे यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले.