भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:20 PM2020-08-18T22:20:22+5:302020-08-18T22:21:00+5:30
बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय जनता पार्टीचे नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला सुरक्षा दलाने घेतला आहे. बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे. उस्मान भाई हा वसीम बारी आणि त्यांचे वडील व भाऊ यांच्या हत्येत सहभागी होता.
दहशतवादी उस्मान याने भाजपा नेते वसीम बारी, त्यांचा भाऊ आणि वडील यांना ठार मारले होते. या दहशतवाद्याचा खात्मा केल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा दलाला मोठे यश मिळले आहे, असे काश्मीर रेंजचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले.
गेल्या महिन्याच्या 8 तारखेला जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी वसीम बारीची हत्या केली होती. दहशतवाद्यांनी वसीम बारी यांचा भाऊ आणि वडील यांनाही गोळ्या घालून ठार केले होते.
बारामुल्लाच्या क्रेइरी भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात 36 तास चकमक सुरु होती. यात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. वसीम बारी यांच्या हत्येत सहभागी असलेला उस्मान भाई हा या चकमकीत मारला गेला. तो गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये आणि उत्तर काश्मीरमध्ये सक्रीय होता.
याआधी सोमवारी रात्री क्रेइरी भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन थांबविले होते. मात्र, मंगळवारी पहाटे पुन्हा गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.