चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बसमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 04:28 PM2022-09-22T16:28:04+5:302022-09-22T16:28:49+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले आहे.
बरेली: उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक बसमध्ये मोठा स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार्जिंग दरम्यान इलेक्ट्रिक बसमध्ये स्फोट झाल्याची घटना बरेलीच्या फोर्ट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याच परिसरातील एका चार्जिंग स्टेशनवर इलेक्ट्रिक बसची चार्जिंग सुरू होती. त्याचवेळी बसमध्ये अचानक स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले. बसमध्ये झालेल्या स्फोटामुळे घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
बसमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी, एसएसपी, एसपी सिटी यांच्यासह अन्य उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचीही पाहणी करण्यात आली. बरेलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक बसमधील स्फोटाच्या कारणांची माहिती दिली आहे. या संपूर्ण घटनेबाबत बरेलीचे जिल्हाधिकारी शिवकांत द्विवेदी म्हणाले की, चार्जिंग स्टेशनवर कॉम्प्रेसर किंवा तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाल्याची शक्यता आहे.