"बाप आमदार असूनही हुंडा मिळाला नाही"; माजी आमदाराच्या लेकीचे सासरच्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:26 PM2024-02-22T18:26:42+5:302024-02-22T18:34:09+5:30
साक्षी मिश्राने काही वर्षांपूर्वी अजितेश नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. साक्षीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यावरून बराच गदारोळ झाला होता.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील भाजपाचे माजी आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांची मुलगी साक्षी हिने सासरच्या लोकांवर हुंड्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. साक्षीने एसएसपी कार्यालयात जाऊन सासरच्या मंडळींवर हुंडा मागितल्याचा आणि छळ केल्याचा आरोप केला. साक्षीच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासरच्या लोकांनीही तिला मारहाण देखील केली आहे.
साक्षी मिश्राने काही वर्षांपूर्वी अजितेश नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. साक्षीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यावरून बराच गदारोळ झाला होता. पण साक्षीने अजितेशची साथ सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. या प्रकरणाची तेव्हा खूप चर्चा झाली. मात्र आता साक्षी मिश्रा हिने पती अजितेशसह पोलिसात जाऊन सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. साक्षी सध्या इज्जत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीर सावरकर नगरमध्ये राहते.
साक्षीने सासरे, सावत्र सासू, नणंद, वहिनी आणि आजी यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. साक्षीच्या म्हणण्यानुसार - "माझा प्रेमविवाह होता. त्यामुळे हुंडा न दिल्याने सासरच्या लोकांनी मला मारहाण केली. आमदाराची मुलगी असूनही चांगला हुंडा मिळाला नाही, असं सांगून सासरच्या घरी तिचा छळ केला जातो. आपल्या मुलाचं लग्न एखाद्या सामान्य कुटुंबात केलं असतं तरी त्याला चांगला हुंडा मिळाला असता असं म्हणतात."
"हुंडा न मिळाल्याच्या रागातून सासरे रोज पाणी कनेक्शन व वीज कनेक्शन तोडतात. रोज काही ना काही त्रास देतात. 2019 मध्ये आम्ही हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. आमची केस अलाहाबाद हायकोर्टात दाखल झाली. आमच्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी भीतीही आम्हाला वाटत होती. त्यासाठी न्यायालयाने आम्हाला संरक्षणही दिले होते." साक्षी मिश्रा य़ा घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.