पतीसोबत राहायचंय?, मग दिराशी लग्न कर; हलालाची अघोरी प्रथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 10:00 PM2018-07-09T22:00:10+5:302018-07-09T22:01:02+5:30
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये तीन तलाक आणि हलालाचं प्रकरण समोर आलं आहे.
बरेली- उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये तीन तलाक आणि हलालाचं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीनं स्वतःच्या पहिल्या पत्नीला तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर तलाक घेतलेल्या पहिल्या पत्नीबरोबर पुन्हा राहण्यासाठी चक्क त्यानं स्वतःच्या वडिलांशी हलालाच्या पद्धतीअंतर्गत निकाह लावून दिला. वडिलांशी तलाक घेतल्यानंतर आता तिच्यावर दिरासोबत निकाह करण्याचा दबाव टाकला जातोय.
उत्तर प्रदेशमधल्या बानखाना भागातल्या एका महिलेचा निकाह गढी-चौकीतल्या वसीमबरोबर 2009मध्ये झाला होता. निकाहच्या दोन वर्षांनंतर पतीनं तलाक देत घराबाहेर काढल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. काही महिन्यांनंतर पत्नीला पुन्हा सोबत ठेवण्यासाठी वसीमनं वडिलांशी हलाला पद्धतीअंतर्गत निकाह लावून दिला. त्यानंतर सास-यांनी पीडित महिलेला तलाक दिला आणि वसीमनं तिच्याशी पुनर्विवाह केला आणि ते दोघे सोबत राहू लागले. परंतु दोघांमधील भांडणं काही केल्या कमी झालेली नव्हती. वसीम तिच्यावर अन्याय करत होता आणि 2017ला त्यानं तिला दुस-यांदा तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिलं.
कालांतरानं त्यानं पुन्हा पत्नीला सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यानं हलाला पद्धतीच्या अंतर्गत भावाशी निकाह करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून पुन्हा लग्न करून पत्नीला सोबत ठेवता येईल. पीडित महिलेनं वसीमची अट मानण्यास नकार दिला. आता ती तिच्या बहिणीच्या घरी राहते. पीडित महिलेनं आला हजरत हेल्पिंग सोसायटीच्या अध्यक्षा निदा खान यांच्याकडे स्वतःची कहाणी कथन केली. त्यानंतर महिलेनं मीडियासमोर येऊन दुःख सार्वजनिकरीत्या सांगितलं. दुसरीकडे तीन तलाकवर न्यायालयानं बंदी घातली आहे. मोदी सरकारही तीन तलाक या प्रथेविरोधात कडक कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. तीन तलाक विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. परंतु ते राज्यसभेत प्रलंबित आहे.