लाचखाऊ डॉक्टरांची नाडी आता ‘आयएमसी’च्या हाती
By admin | Published: November 19, 2014 04:44 AM2014-11-19T04:44:32+5:302014-11-19T04:44:32+5:30
परदेशी सहली, मुलांचे शिक्षण, फ्लॅट आणि मर्सडिज गाडीपर्यंतची लाच ‘भेट’ म्हणून औषध कंपन्यांकडून घेऊन विलासी जीवन जगणारे महाराष्ट्रातील दहा डॉक्टर इंडियन मेडिकल कौन्सीलच्या (आयएमसी) हाती लागले आहेत
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
परदेशी सहली, मुलांचे शिक्षण, फ्लॅट आणि मर्सडिज गाडीपर्यंतची लाच ‘भेट’ म्हणून औषध कंपन्यांकडून घेऊन विलासी जीवन जगणारे महाराष्ट्रातील दहा डॉक्टर इंडियन मेडिकल कौन्सीलच्या (आयएमसी) हाती लागले आहेत. देशभरातील ३२६ भ्रष्ट डॉक्टरांच्या यादीत राज्यातील या डॉक्टरांचा समावेश असून,त्यातील सात डॉक्टरांना आयएमसीच्या १३ सदस्यीय नीतिमत्ता समितीपुढे उभे राहावे लागल्याने या डॉक्टरांना घाम फुटला आहे.
केंद्र सरकारच्या आदेशावरून कौन्सीलने लाच प्रकरण गंभीरपणे घेतले असून, या आरोपांत तथ्य आढळल्यास या डॉक्टरांवर फौजदारी करण्यापासून मान्यता रद्द करेपर्यंत सारेच इलाज केले जाणार आहेत. दिल्लात दोन दिवस सुरू असलेल्या चौकशीत देशातील ३२६ पैकी दीडशे डॉक्टर हजर झाले. राज्यातील सात डॉक्टरांनी आपले म्हणणे सादर केले. इतरांना डिसेंबरमध्ये बोलविण्यात आले आहे.
गुजरातेतील अहमदाबादच्या एका औषध कंपनीने आपली महागडी औषधे डॉक्टरांनी रूग्णाला द्यावी यासाठी डॉक्टरांना बंगला, परदेशी सहल, आलीशान मोटारी, फ्लॅट्स, डॉक्टरांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च यासोबत काही डॉक्टरांना रोख स्वरूपात पैसाही पुरविल्याचा आरोप एका सामाजिक संस्थेने करून, या डॉक्टरांबाबतचे पुरावे सरकारला सादर केले.
चार वर्षांपूर्वी काही लाखांवरून सुरू झालेल्या या कंपनीची सध्याची उलाढाल पाचशे कोटींची आहे.
समितीचे एक सदस्य व महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की डॉक्टरांनी आदर्श पेशाच्या नावाखाली सुरू केलेला काळा धंदा लोकांपुढे आहेच पण पुरावे सापडत नव्हते.
आरोप असलेल्या सर्वच डॉक्टरांचा गैरकृत्यात समावेश असेल असे सांगता येत नाही, पण पुढे आलेली कागदपत्रे व पुरावे महाभंयकर स्थिती असल्याने कौन्सीलने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे.
कुणावर उगीच आरोप केले असतील तर त्यांचा बचावही करू,
असे त्यांनी स्पष्ट केले. किंबहुना
अजून आरोप सिद्ध व्हायचे आहेत,
या कारणास्तव त्यांनी यादीतील नावे उघड करण्यास नकार दिला.