बरखा दत्त यांची 21 वर्षांनंतर एनडीटीव्हीला सोडचिठ्ठी
By admin | Published: January 16, 2017 08:16 AM2017-01-16T08:16:41+5:302017-01-16T08:21:02+5:30
ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीमधून राजीनामा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीमधून राजीनामा दिला आहे. बरखा दत्त या एनडीटीव्हीमध्ये सल्लागार संपादक या पदावर कार्यरत होत्या. रिपोर्टनुसार, त्या स्वतःचा नवा व्हेंचर सुरू करण्याच्या तयारीत आहेत. बरखा दत्त यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीटीव्हीनं एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात वाहिनीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
1995ला कॉलेजमधून पासआऊट झाल्यानंतर बरखा दत्त या थेट एनडीटीव्हीमध्ये रुजू झाल्या. 21 वर्षं वाहिनीसाठी काम केल्यानंतर बरखा दत्त यांनी अपील करून नव्या संधीच्या शोधात असून, स्वतःच्या व्हेंचरसाठी काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. एनडीटीव्हीच्या कार्यकाळात त्यांनी फार प्रगती केली. भारतासोबत त्या अनेक देशांमध्ये प्रसिद्ध झाल्या. तसेच त्यांनी बरेच पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत. आम्हाला विश्वास आहे की बरखा आणखी प्रगती करेल, एनडीटीव्ही त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.
(अर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा)
(अर्णब गोस्वामी पत्रकार आहे का ? - बरखा दत्त)
बरखा दत्त यांनी 1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात केलेल्या कव्हरेजमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, त्यांना पद्मश्रीनंही गौरवण्यात आलं आहे. मात्र त्यांच्यावर काही प्रकरणातून टीकाही करण्यात आली होती. राडिया टेप प्रकरणात त्यांचं नाव जास्त गाजलं होतं. बरखा दत्त यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर त्यांचं ट्रेंडिंग सुरू आहे. ट्विटरवरून त्यांच्या फॉलोव्हर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्णब गोस्वामी यांनी असाच राजीनामा दिला होता. त्यावेळीही गोस्वामी ट्रेंडिंगमध्ये होते.