राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:58 PM2020-08-06T12:58:21+5:302020-08-06T13:00:41+5:30

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला.

Barmer, 250 people of 50 Muslim families adopted Hindu religion, Ayodhya Ram Mandir Nirman | राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!

Next
ठळक मुद्देराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत.

जयपूर : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पार पडला. याचदरम्यान, राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणाऱ्या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आहे.

हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, "मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे आहे, असे ठरवले. तर, मुस्लिम आपल्यापासून अंतर ठेवतात. आमच्या प्रथा संपूर्ण हिंदू धर्माशी संबंधित आहेत. यानंतर संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्मात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर 50 मुस्लीम कुटुंबीयांतील 250 सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला."

गावातील हरजीराम यांच्या म्हणण्यानुसार, कांचन ढाढ़ी जातीचे हे संपूर्ण कुटुंब बर्‍याच वर्षांपासून हिंदू रूढी-परंपरा  पाळत होते. दरवर्षी ते आपल्या घरात हिंदू सण साजरे करतात. याच कुटुंबीयातील विंजारम यांनी सांगितले की, "मुस्लीम रीति-रिवाजांनुसार आम्ही कोणतेही धार्मिक कार्य केले नाही. रामजन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी आम्ही सर्वांनी होम-हवनचा कार्यक्रम आयोजित केला आणि हिंदू संस्कृतीचा पाठपुरावा करून स्वेच्छेने हिंदू धर्मात परतलो. यासाठी कोणाचाही दबाव नाही."

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबीयांनी गावच्या सरपंचांना बोलावून हवन केला. कुटंबीयांतील सर्वांची नावे हिंदू धर्मानुसार आहेत. विंजाराम यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते. मात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याचबरोबर, या कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला. तर गावचे सरपंच प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते.
 

Web Title: Barmer, 250 people of 50 Muslim families adopted Hindu religion, Ayodhya Ram Mandir Nirman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.