टेन्शन वाढलं! पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 07:58 AM2020-05-07T07:58:13+5:302020-05-07T08:03:22+5:30
आता सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे.
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. पण भारतानं कोरोनाला रोखण्यात इतर देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्याला भारतीय लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यातच आता सीमावर्ती भागातून भारताच्या राजस्थानमध्ये पाकिस्तान नवंच संकट पाठवत आहे. राजस्थानच्या पश्चिमी भागात पाकिस्ताननं मोठ्या प्रमाणात टोळ पाठवण्यास सुरुवात केली आहे. टोळांच्या एक मोठ्या गटानं पश्चिम राजस्थानच्या सीमेवर घुसखोरी केली आहे. पश्चिम राजस्थानच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून टोळांद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांवर जोरदार हल्ला सुरू आहे. या टोळधाडीमुळे राजस्थानमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या वर्षी या टोळांच्या समूहानं कहर केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. त्यावेळीसुद्धा संपूर्ण पिके नष्ट झाली होती. गेल्या वर्षी या टोळधाडीनं संपूर्ण पीक नष्ट केल्याचे शेतकरी सांगतात. एकीकडे कोरोना विषाणूच्या धोक्यापासून स्वतःचा जीव वाचवायचा असतानाच दुसरीकडे पिकांचं टोळांपासून कसं संरक्षण करावं, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. टोळांच्या हल्ल्यामुळे शेतकरी चिंतेत असून, पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी टोळांना घरातील भांडी वाजवून शेतापासून दूर पळवत आहेत.
शेतकरी राजेंद्र सांगतात की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या गावात आणि सीमेवरील इतर गावांमध्ये टोळांचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्व सावध आहोत. टोळ व कीटकांपासून पिकाचे संरक्षण करण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. केंद्र व राज्य सरकारांनी टोळांवर नियंत्रण काही योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. तामलोरचे सरपंच हिंदूसिंह सांगतात की, टोळांच्याविषयी आमच्याकडे आधीपासूनच माहिती होती, त्यासाठी आम्ही जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभाग, टोळ विभाग आणि प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेतली होती आणि त्यांना टोळ नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले होते. 22 एप्रिल रोजी टोळ नियंत्रणासाठी कंट्रोल रूम उघडण्यातही आली. कंट्रोल रूमचे क्रमांकही सार्वजनिक केले आहेत आणि टोळांच्या आगमनाविषयी माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी सीमेवरील खेड्यांमध्ये टोळ दिसले.
मंगळवारी रात्री इंद्राणी आणि रतनानी भागात टोळ आल्याची माहिती मिळाली, त्यांना नियंत्रित करण्यासाठी चार गाड्या पाठवण्यात आल्या. याशिवाय गडरा रोड पांचला, रोहिडाळा, बिजावळ, रेणू का पार, सोडियाला मायानी या गावांमध्येही टोळांनी घुसखोरी केली होती. राजस्थानमधल्या बाडमेर जिल्ह्यातील चौहटनमधील वीरसिंगची ढाणी आणि कोटामधील तलावांमध्ये टोळ दिसले. तेथेही दोन वाहने पाठवून टोळांवर नियंत्रण मिळवले गेले. आगामी काळात टोळांशी सामना करण्यासाठी आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. जर आम्हाला गाड्या हव्या असतील तर आम्ही त्या भाड्याने घेऊ. बाडमेरचे जिल्हाधिकारी राकेश कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षात टोळांच्या मोठ्या झुंडीने शेतकर्यांच्या रबी व खरीप पिकांचे नुकसान केले आहे, ज्यावर प्रशासनानेही शेतकर्यांच्या पिकांचा विशेष पंचनामा करून नुकसानभरपाई दिली.