भीषण अपघात! BSF चं वाहन आणि ट्रकची जोरदार धडक; 2 जवानांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 10:32 AM2022-11-05T10:32:04+5:302022-11-05T10:38:53+5:30
अपघातात बीएसएफच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बारमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री बीएसएफचे वाहन आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की बीएसएफच्या गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात बीएसएफच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जोधपूरला हलवण्यात आले आहे. दोन जवानांवर बारमेर आणि एका जवानावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बारमेर-चौहटन मार्गावरील चौहटन बसस्थानकाजवळ हा अपघात झाला. सीमा सुरक्षा दलाच्या 83 व्या बटालियनचे सात जवान सेडवा येथून बारमेरला त्यांच्या कामासाठी येत होते. याचदरम्यान चौहान शहराजवळ बीएसएफचे वाहन आणि समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच चौहटन पोलीस ठाणे व परिसरातील नागरिक तेथे पोहोचले. त्यांनी तत्काळ गंभीर जखमी जवानांना चौहटन येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर चार जवानांना बारमेर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले. त्याचवेळी जखमी जवानाला चौहटन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. नंतर बाडमेरमधील दोन जवानांनाही जोधपूरला पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बीएसएफचे अधिकारी, जिल्हाधिकारी लोकबंधू, एएसपी नरपत सिंह जैतावत आणि एसडीएम घटनास्थळी पोहोचले.
जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफचे वाहन आणि ट्रक यांच्यात धडक झाली. गाडीत 7 सैनिक होते. बीएसएफच्या 83 व्या बटालियनचे दोन जवान के. टुडू आणि धीरज कुमार यांचा मृत्यू झाला. एन. सिलवास आणि कुंदन केआर दुबे यांच्यासह पाच जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उत्तम उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. बीएसएफचे जवान कामावर होते आणि ड्युटीवर असताना ही दुर्घटना घडल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"