बॅरिकेट्स हटविले; शेतकरी रस्त्यावरच; राकेश टिकैत यांनी केंद्राला दिली २६ नोव्हेंबरची डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:31 AM2021-11-02T06:31:50+5:302021-11-02T06:32:05+5:30
पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील.
विकास झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रस्ते अडवू नका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिथे जिथे शेतकरी आंदोलन सुरू आहे तिथले बॅरिकेट्स पोलिसांनी हटवले आहेत. परंतु शेतकरी अद्यापही रस्त्यांवर असल्याने वाहतुकीचा प्रश्न कायम आहे.
पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले असले तरी तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. पोलिसांनी बळजबरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व शेतकरी ठिय्या देतील आणि तिथेच काळी दिवाळी करतील. केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. या दिवशी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरद्वारे दिल्लीच्या सीमांवर पोहोचतील आणि तिथे कायमस्वरूपी तंबू बांधतील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
गाझीपूर येथील आंदोलनाच्या जागेजवळील सिमेंट आणि लोखंडी बॅरिकेड्स व काटेरी तारा पोलिसांनी हटवल्यानंतर टिकैत यांनी सरकारला इशारा दिला आहे. सीमेवरून शेतकऱ्यांना जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न झाल्यास देशभरातील सरकारी कार्यालये मंडईत परिवर्तित झालेली दिसतील. दरम्यान, युनायटेड किसान मोर्चाचे सदस्य आणि भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंग चढुनी यांनीही केंद्रावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास यावेळची दिवाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर करू.
सीमांवर काय आहे स्थिती?
गाझीपूर सीमा, टिकरी सीमेवरीला अडथळे पोलिसांनी हटवले आहेत. परंतु रहदारी मात्र नेहमीसारखी एकाच लेनने सुरू आहे. सिंघू सीमा, रेवाडी-मानेसर मार्गावरील आंदोलनस्थळी बॅरिकेट्स जैसे थे आहेत. त्यामुळे या महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांना कासवगतीने पुढे जावे लागते.