वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; महामार्गावरील टोल घेण्याची पद्धत बदलणार, सरकारची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:09 PM2023-08-02T23:09:30+5:302023-08-02T23:10:48+5:30
नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.
नवी दिल्ली : जर तुम्ही अनेकदा महामार्गावरून कारने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुमचा टोल टॅक्सवर खर्च होणारा वेळ आणखी कमी होणार आहे. सरकार लवकरच अडथळारहित टोलवसुली यंत्रणा (Barrier-less toll system) सुरू करण्याचा विचार करत आहे. नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही.
यासंदर्भात बुधवारी माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही के सिंह म्हणाले की, अडथळारहित टोल वसुली यंत्रणा सध्या चाचणीत आहे. आमची चाचणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही लवकरच त्याची अंमलबजावणी करू. देशातील रस्त्यांवर निश्चित केलेल्या प्रवास अंतराच्या आधारे टोल भरण्याची व्यवस्थाही लागू केली जाईल. टोलवसुलीची नवी यंत्रणा कार्यान्वित झाल्यास तिची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळही कमी होईल, असे व्ही के सिंह म्हणाले.
वाहनांवर FASTag लावल्यामुळे टोल बुथवर लागणारा वेळ 47 सेकंदांवर आला आहे. परंतु सरकारला ते आणखी कमी करून 30 सेकंदांपेक्षा कमी करायचे आहे. यासाठी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर पायलट (प्रायोगिक) चाचणी सुरू आहे ज्यामध्ये उपग्रह आणि कॅमेरा आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. जेव्हा तुम्ही महामार्गावर प्रवेश करता आणि तेथे बसवलेला कॅमेरा तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्कॅन करतो, त्यानंतर त्या आधारे टोल बुथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास केला, हे निश्चित केले जाते, असे व्ही के सिंह यांनी सांगितले.
याचबरोबर, हे सध्याच्या व्यवस्थेपेक्षा वेगळे आहे. ज्यामध्ये तुम्ही महामार्गावर किती किलोमीटरचा प्रवास केला याच्याशी काहीही संबंध नाही. हे पेमेंट टोलच्या नियमांवर आधारित आहे. तसेच, दूरसंचार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात सध्याच्या सरकारने केलेल्या कामामुळेच अशी प्रगती होत आहे. दूरसंचार नेटवर्कमधील सुधारणांमुळे टोल प्लाझावर वाहनांचा डेटा गोळा करण्यात मदत होत आहे, असेही व्ही के सिंह यांनी सांगितले.