बार्टीचे विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित; यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 04:15 AM2019-07-25T04:15:15+5:302019-07-25T04:15:27+5:30
आर्थिक तजवीज असतानाही प्रशासनाकडून टाळाटाळ
उमेश जाधव
नवी दिल्ली : यूपीएससीच्या तयारीसाठी आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून अनुसूचित जाती/जमातीतील विद्यार्थी ‘बार्टी’चा पर्याय निवडतात. मात्र, ‘बार्टी’चे लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना विलंबाने विद्यावेतन मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश असून, त्यांना महिनाअखेरीस विद्यावेतन मिळत असल्याने आर्थिक गणित जुळवताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला पाठवण्यात येते. दिल्लीला जाण्यासाठी पाच हजार व इतर खर्च तीन हजार रुपये, दिल्लीत राहण्यासाठी १२ हजार रुपये दरमहा विद्यावेतन आणि खासगी संस्थेत कोचिंगसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च बार्टीकडून केला जातो.
सरकारकडून ‘बार्टी’साठी नियमितपणे आर्थिक तरतूद केली जात असताना विद्यार्थ्यांना पैसे का मिळत नाहीत? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. महिन्याच्या सुरुवातीला विद्यावेतन मिळणे आवश्यक असताना ते महिनाअखेरीस मिळत असल्यामुळे घरभाडे, राहण्याचा खर्च करणे कठीण होत आहे, असे विद्यार्थ्याने सांगितले.
दोन वर्षांपूर्वी ‘बार्टी’ला सरकारकडून वेळेत निधी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळण्यास विलंब होत होता. मात्र, आता निधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांना वेळेवर विद्यावेतन मिळावे, असाच आमचा प्रयत्न आहे. या वर्षी काही विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले असेल तर ते तातडीने देऊ. - कैलास कणसे, महासंचालक, बार्टी
२०१७-१८ या बॅचचा मी ‘बार्टी’चा विद्यार्थी होतो. आम्हाला या वर्षात सलग तीन महिने विद्यावेतन मिळाले नाही. यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेत यश मिळवल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ‘बार्टी’कडून निधी न मिळाल्यामुळे कोचिंग सुरू करता आले नाही. त्यामुळे मुख्य परीक्षेत मी केवळ पाच गुणांसाठी अनुत्तीर्ण झालो. - नितीन इंगळे, विद्यार्थी
पात्र उमेदवारांना दिल्लीला जाण्यासाठी सुरुवातीला स्वत:च खर्च करण्यास सांगितले जाते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या विद्यार्थ्यांना दिल्लीत येण्याचा आणि राहण्याचा सुरुवातीचा खर्च करणे अशक्य असते. विद्यार्थ्यांनी हे पैसे जमवून स्वत:ची व्यवस्था केली तरी हे पैसे ‘बार्टी’कडून कधीही वेळेवर दिले जात नाहीत, असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
यूपीएससीच्या तयारीसाठी परभणीतून आलेल्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, माझी घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. कॉमर्स हा वेगळा विषय असल्यामुळे त्याच्या कोचिंगसाठी ५६ हजार रुपये शुल्क आहे. ‘बार्टी’कडून या विषयासाठी ४५ हजार रुपये मिळतात. मात्र, ते अद्याप मिळालेले नाहीत. मी उर्वरित ११ हजार रुपये शुल्क स्वत: भरले असून ‘बार्टी’कडून पैसे मिळण्याची प्रतीक्षा आहे. ‘बार्टी’कडे पाठपुरावा केला असता तेथील अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे.
‘बार्टी’कडून दर महिन्याला विद्यावेतन मिळत नाही. त्यासाठी दोन-तीन महिनेही प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे दिल्लीतील विद्यार्थ्यांना खर्चात बचत करण्यासाठी दिवसभरात केवळ एकवेळ जेवणावर भागवावे लागत असल्याचे उघडकीस आले आहे.