आधारच निराधार, 13.5 कोटी आधार कार्ड डाटा लीक
By admin | Published: May 3, 2017 11:11 AM2017-05-03T11:11:45+5:302017-05-03T11:11:45+5:30
अनेक सरकारी विभागांनी करोडो लोकांची आधार कार्डमधील माहिती सार्वजनिक केली असून कोणीही ही माहिती मिळवू शकतो
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - बंगळुरुच्या सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटीच्या (सीआयएस) एका रिपोर्टमुळे पुन्हा एकदा आधार कार्डच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. रिपोर्टमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार जवळपास 13.5 कोटी आधार कार्ड डाटा लीक झाल्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अनेक सरकारी विभागांनी करोडो लोकांची आधार कार्डमधील माहिती सार्वजनिक केली असून कोणीही ही माहिती मिळवू शकतो. चार डाटाबेसचा अभ्यास केल्यानंतर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. मात्र या रिपोर्टमध्ये डाटा लीक होण्यामागे कोणतं कारण आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. जाणुनबुजून हा लीक करण्यात आला की कोणत्या त्रुटीमुळे लीक झाला हे कळू शकलेलं नाही.
रिपोर्टनुसार सर्वात आधी जिथे आधार कार्ड डाटा लीक झाला त्यातील दोन डाटाबेस ग्रामविकास मंत्रालयाशी संबंधित आहेत. यामध्ये नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामचा डॅशबोर्ड आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या पोर्टलचा समावेश आहे. दोन डाटाबेस आंध्रप्रदेशशी संबंधित आहेत. यामध्ये राज्याचं नरेगा मॉडेल आणि चंद्राना विमा नावाच्या सरकारी योजनेच्या डॅशबोर्डचा समावेश आहे. यावर लाखो लोकांच्या आधार कार्डची माहिती उपलब्ध आहे. जी कोणीही कधीही जाऊन सहजरित्या पाहू शकतो.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की चारही पोर्टल्सवरुन लीक झालेला डाटा 13 ते 13.5 कोटीपर्यंत असू शकतो. यामध्ये 10 कोटी अकाऊंट नंबर्स असण्याची शक्यता आहे. नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्रामच्या पोर्टलवर आधार कार्डनी जोडले गेलेले किमान 94.32 लोक बँक खातं तर 14.98 लाख लोक पोस्ट ऑफिसची माहिती देतात.
विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आधार कार्डची माहिती लीक करण्यात आली होती. यानंतर त्याची पत्नी साक्षीने ट्विट करत याची तक्रार केली होती. यानंतर सरकारने कारवाई करत डाटा लीक करणा-या कंपनी सीएससीला 10 वर्षासाठी निलंबित केलं होतं.
सीआयएसने याआधीही आधार बायोमेट्रिक डाटावर आधारित असल्याने असुरक्षित असल्याचा दावा केला आहे. यामध्ये अनेक तांत्रित त्रुटी असून यामुळे डाटा सुरक्षित ठेवणं खूप मोठं आव्हान आहे. देशातील 115 कोटी लोकांनी आधार कार्ड तयार केलं आहे. इतक्या लोकांचा डाटा एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवणं धोक्याचं असून खूप मोठं आव्हान आहे.