बस्सी यांच्याकडे पद नाहीच...!
By admin | Published: February 20, 2016 02:54 AM2016-02-20T02:54:11+5:302016-02-20T02:54:11+5:30
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांचे नाव केंद्रीय माहिती आयुक्तपदाच्या यादीतून अखेर वगळण्यात आले. बस्सी या महिन्याअखेर निवृत्त होत असून, त्यांना केंद्रीय माहिती आयुक्त करण्यात
नवी दिल्ली : दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांचे नाव केंद्रीय माहिती आयुक्तपदाच्या यादीतून अखेर वगळण्यात आले. बस्सी या महिन्याअखेर निवृत्त होत असून, त्यांना केंद्रीय माहिती आयुक्त करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. संभाव्य माहिती आयुक्तांच्या नावांच्या यादीत बी. एस. बस्सी यांचा समावेश होता. मात्र केंद्र सरकारने शुक्रवारी केंद्रीय माहिती आयुक्तपदी बिमल जुल्का आणि डी. पी. सिन्हा या दोघांचीच नियुक्ती केली. बस्सी यांनी केंद्रीय माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त या दोन्ही पदांसाठी अर्ज केला होता.
माहिती आयुक्त नियुक्त करण्यासाठीच्या समितीमध्ये पंतप्रधानांचे प्रतिनिधी जितेंद्र सिंह, केंद्रीय अर्थमंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश होता. पंतप्रधान कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीला तिघे हजर होते. या समितीच्या शिफारशीनुसार दोघांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सहा आठवड्यात नव्या आयुक्तांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते.
माहिती आयुक्तपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आल्याबद्दल बस्सी यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण अजिबात नाराज नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)