कोरोना काळात घेतलेल्या 15 लाखाच्या अॅम्ब्युलन्सचा आता बुट सुकवण्यासाठी वापर, निघाली भंगारात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 01:19 PM2023-04-03T13:19:35+5:302023-04-03T13:20:42+5:30
कोरोना काळात आरोग्य महासंचालनालयाकडून आलेली जवळपास १५ लाख रुपयांची नवी कोरी अॅम्ब्युलन्स विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भंगारात निघाली आहे.
बस्ती-
कोरोना काळात आरोग्य महासंचालनालयाकडून आलेली जवळपास १५ लाख रुपयांची नवी कोरी अॅम्ब्युलन्स विभागीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भंगारात निघाली आहे. अत्याधुनिक सुविधांनी ही अॅम्ब्युलन्स सज्ज होती. पण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अॅम्ब्युलन्सचा अजिबात वापर केला गेला नाही आणि ती अॅम्ब्युलन्स लाइफ सपोर्ट सिस्टमशी जोडण्यासाठीचं बजेट आणि सामान पाठवण्यात आलं नाही.
जबाबदार अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अॅम्ब्युलन्सचं रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे तिचा वापर करता आलेला नाही. जवळपास तीन वर्षांपूर्वी आरोग्य महासंचलनालयानं अॅम्ब्युलन्स बस्तीच्या आरोग्या विभागाला पाठवली होती. या अॅम्ब्युलन्समध्ये अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टम बसवलं जाईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यासोबतच तिचा वापर १०८ क्रमांक डायल करण्याऐवजी आरोग्य अधिकारी आपल्या पातळीवर गरजूंना तातडीनं उपलब्ध करुन देण्यासाठी वापरतील असं ठरवण्यात आलं होतं.
महत्वाची बाब म्हणजे या विभागासाठी वेगळं बजेट देखील मंजुर करण्यात आलं होतं. धक्कादायक बाब अशी की अॅम्ब्युलन्स रजिस्ट्रेशन न करताच पाठवण्यात आली होती. कोरोना काळात अशापद्धतीनं अत्याधुनिक फिचर्सनं सज्ज असलेल्या अॅम्ब्युलन्स जिल्ह्यांना पाठवण्यात आल्या होत्या. अॅम्ब्युलन्स आल्याच्या ६ महिन्यांनंतर गाडीचे चेसी नंबर मागवण्यात आले होते. जेणेकरुन वाहनांचं रजिस्ट्रेशन होऊ शकेल. पण बस्ती येथील या अॅम्ब्युलन्सचं रजिस्ट्रेशनच होऊ शकलेलं नाही. त्यासाठीचे कुणीच प्रयत्न केले नाहीत.