'ही' महिला घरामध्ये सांभाळतेय 400 वटवाघुळं, पण निपाहची अजिबात भीती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:29 IST2018-05-25T12:14:27+5:302018-05-25T13:29:04+5:30
घरामध्ये 400 वटवाघुळं सांभाळते आहे.

'ही' महिला घरामध्ये सांभाळतेय 400 वटवाघुळं, पण निपाहची अजिबात भीती नाही
मेहसण- निपाह व्हायरने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. निपाहचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वटवाघुळामुळे पसरणारा हा आजार असल्याने लोकांमध्ये दहशत आहे. पण एक अशी महिला आहे जी तिच्या घरामध्ये 400 वटवाघुळं सांभाळते आहे. विशेष म्हणजे निपाह व्हायरचा संसर्ग होण्याची जराही भीती या महिलेला नाही. अहमदाबादपासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजपूर गावात ही महिला राहते. शांताबेन प्रजापती (वय 74) असं या महिलेचं नाव असून दोन खोल्यांच्या घरात त्यांच्याबरोबर 400 वटवाघुळंही राहतात. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
'मी निपाह व्हायरसबद्दल ऐकलं. पण मला त्याची जराही भीती वाटत नाही. मी या वटवाघुळांबरोबर दहा वर्षापासून राहते आहे. ते माझं कुटुंब आहे. या वटवाघुळांची संख्या माझ्याच घरात वाढली आहे, असं प्रजापती यांनी सांगितलं. प्रजापती यांच्या घरातील चार भींतीवर फक्त वटवाघुळंच बघायला मिळतात.
दहा वर्षापूर्वी प्रजापती यांच्या घराच्या तुटलेल्या भिंतीमधून एक वटवाघुळ घरात आलं होतं. सुरूवातील त्याची भिती वाटली. घरामध्ये आलेलं वटवाघुळ हे 'माऊस टेल्ड बॅट' असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. माऊस टेल्ड बॅट हे सवयीनुसार रात्री बाहेर फिरतात तर सकाळी परत निवाऱ्याकडे येतात. प्रजापती या त्यांच्या घरी एकट्याच राहतात. त्यांच्या तिन्ही मुलींची लग्न झाली आहेत तर मुलगा नोकरी निमित्ताने मुंबईत आहे. प्रजापती यांनी शेतमजूर म्हणून काम करून मुलांना सांभाळलं आहे. त्या 30 वर्षाच्या असताना त्यांच्या पतीचं निधन झालं होतं.
वटवाघुळांची विष्ठा साफ करताना तसंच दुर्गंधीपासून वाचण्यासाठी प्रजापती दररोद घरात लिंबू आणि कापूर जाळतात. दरम्यान, शांताबेन प्रजापती यांच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांच्या घरातही वटवाघुळं होती पण त्यांनी घालविली. मी तसं करू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.