तोफखाना होणार प्रबळ; अल्ट्रालाइट हॉवित्झर, के ९ वज्रमुळे सामर्थ्यात मोलाची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:48 AM2018-11-02T05:48:35+5:302018-11-02T06:47:33+5:30
भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
- निनाद देशमुख
पुणे : भारतीय लष्कराच्या सैन्यदलाची गेल्या २० वर्षांपासूनची आधुनिक तोफांची मागणी येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अमेरिकन बनावटीच्या अल्ट्रालाईट हॉवित्झर आणि कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा येत्या शुक्रवारी लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. नाशिक येथील आर्टिलियरी सेंटरमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या अत्याधुनिक तोफांचे हस्तांतरण होणार असून, सैन्याच्या मारकक्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
कुठल्याही लष्करात तोफखाना महत्त्वाचा असतो. कारण, दूरवर तोफगोळ्यांची मारकक्षमता तसेच पुढे असलेल्या सैन्याला कव्हर करण्यासाठी मोलाची भूमिका तोफखाना बजावत असतो. भारतीय लष्करात सद्यस्थितीत बोफोर्स तोफ ही सर्वाधिक आधुनिक तोफ आहे. या अल्ट्रालाईट हॉवित्झर प्रकारच्या तोफा लष्करात असाव्या, अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून होती. मात्र, बोफोर्स प्रकरणानंतर नव्या तोफा लष्करात दाखल होऊ शकल्या नव्हत्या.
यामुळे सर्व भार हा बोफोर्स तोफांवर येत होता. तसेच तोफखान्यातील काही महत्त्वाच्या तोफांचा कालावधी संपल्याने त्या निवृत्त करण्यात आल्या. यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढणे गरजेचे असल्याने नव्या तोफा लष्करात दाखल होणे गरजेचे होते. गेल्या काही दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार अल्ट्रालाईट हॉवित्झर (एम ७७७) तोफा तयार करण्यात आल्या आहेत. तसेच कोरियन बनावटीच्या के ९ वज्र या तोफा लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहेत. आधुनिक असलेल्या या तोफांमुळे लष्कराची २० वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. जवळपास ४० ते ४५ किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता या तोफांमध्ये आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून हस्तांतरण
नाशिक येथील आर्टिलियरी सेंटरला येत्या शुक्रवारी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन भेट देणार आहेत. या वेळी आयोजित कार्यक्रमात या दोन्ही तोफा लष्कराला हस्तांतरित करणार आहेत.
भारतीय लष्कराला गेल्या ३० वर्षांपासून आधुनिक तोफांची गरज होती. दरम्यान झालेल्या सरकारने बोफोर्स प्रकरणामुळे नवी शस्त्रे खरेदी केली नाही. याचे गंभीर परिणाम भारताच्या सुरक्षेवर झाला. यामुळे नव्या तोफांची गरज भारतीय सैन्यदलाला होती. या तोफांचे अनेक भाग भारतातच बनविलेले आहेत. यामुळे शस्त्रास्त्रनिर्मितीतसुद्धा आपण पुढे गेलो आहोत.
- दत्तात्रय शेकटकर,
निवृत्त लेफ्टनंट जनरल
तोफखाना दलाची पोकळी निघणार भरून
१९८४ नंतर बोफार्स प्रकरणानंतर लष्कराच्या तोफखान्यात नव्या तोफा दाखल झाल्या नव्हत्या. केवळ बोफार्स याच तोफांवर लष्कराचा भार होता. या बरोबरच नवी लष्करी साधने सुद्धा येऊ शकली नव्हती. मध्यम पल्ल्याच्या अनेक तोफा निवृत्त झाल्यामुळे तोफखान्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. यामुळे ही पोकळी भरून निघणे आवश्यक होते. या दोन नव्या तोफा लष्कराच्या ताफ्यात दाखल होत असल्याने गेल्या २० वर्षांतील पोकळी भरून निघणार आहे.
-निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे