Coronavirus :"कोरोनाविरुद्धची लढाई हा लोकांनी चालविलेला महायज्ञ"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 06:18 AM2020-04-27T06:18:02+5:302020-04-27T06:18:40+5:30
लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
नवी दिल्ली : देश सध्या लढत असलेली कोरोनाविरुद्धची लढाई हा खऱ्या अर्थी लोकांनी हाती घेतलेला महायज्ञ आहे व प्रत्येक नागरिक यात आपल्या कुवतीनुसार आहुती देत आहे. लढाईत जनता आघाडीवर आहे व सरकार आणि प्रशासन तिला साथ देत आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृतनिश्चयाबद्दल देशवासीयांचे रविवारी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
‘आकाशवाणी’वरून ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, गरिबीशी दोन हात करणाºया व विकासाची आंस ठेवून मार्गक्रमण करणाºया भारतासारख्या देशापुढे अशा प्रकारची लढाई लढण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. देशातील प्रत्येक नागरिक या लढाईत शिपाई म्हणून व सेनानी म्हणून सामील झाला, हे देशाचे मोठे भाग्य आहे. इतिहासात या अभूतपूर्व लढाईची नक्कीच गौरवाने नोंद केली जाईल. मोदी म्हणाले की, प्रत्येक कठीण परिस्थिती, प्रत्येक लढाई आपल्याला काही तरी नवे धडे देते, काही नव्या शक्यतांचे मार्ग प्रशस्त करते व काही नव्या उद्दिष्टांचेही संकेत देते. आताच्या अडचणीच्या काळात देशवासीयांनी दाखविलेल्या दृृढनिश्चयाने देशात काही नव्या बदलांनाही सुरुवात झाली आहे. उद्योग, कार्यालये, शिक्षण संस्था व वैद्यकीय क्षेत्र काही तरी नवे करण्यास, नवे मार्ग शोधण्यास आतुर झाले आहे. सर्वांनी एखादी गोष्ट एकदिलाने करायची म्हटले की, काय केले जाऊ शकते, याचा अनुभव आपण सर्वच घेत आहोत.
पंतप्रधान म्हणाले की, सध्याच्या ‘लॉकडाऊन’ने आपल्याला समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. त्यातूनच आपले हात इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात करुणा आणि ममत्वाची भावना जागृत झाली आहे.
आताच्या या महामारीच्या निमित्ताने आयुर्वेदाची महती पटवून देण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले की, जगाने योगाचा जसा सहर्ष स्वीकार केला तसाच आयुर्वेदाचाही नक्की स्वीकार केला जाईल. यासाठी तरुण पिढीला कंबर कसावी लागेल. जगाला एखादी गोष्ट पुराव्याने सिद्ध केल्यावरच पटत असेल तर आपल्याला ती त्या पद्धतीने पटवून द्यावी लागेल.
>फालतू आत्मविश्वास नको
आग, कर्ज आणि आजारपण यांना कमी लेखले तर ते दुपटीने आपल्यावर उलटतात या अर्थाचा एक संस्कृत श्लोक उद््धृत करून मोदी म्हणाले की, कोरोना माझ्यापर्यंत, माझ्या गल्ली-मोहल्ल्यापर्यंत येऊच शकत नाही, अशा फालतू आत्मविश्वासात कोणीही राहू नये.
‘लॉकडाउन’ने समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे. एरवी ज्यांची आपण दखलही घेत नाही, अशा लहान-सहान लोकांच्या उपयुक्ततेचे महत्त्व आपल्याला पटले आहे. इतरांना मदत करण्यासाठी पुढे जात आहेत व आपल्या मनात ममत्व जागे झाले आहे.