न्यायालयीन लढाईला तयार!
By admin | Published: October 26, 2016 05:18 AM2016-10-26T05:18:11+5:302016-10-26T05:18:11+5:30
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलल्या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे, शापूरजी पालनजी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
नवी दिल्ली : सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हाकलल्या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे, शापूरजी पालनजी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, टाटा सन्सने मात्र, या प्रकरणी न्यायालयीन लढाईची पूर्ण तयारी केलेली दिसते. कंपनीच्या वतीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे कॅव्हेट दाखल करण्यात आले.
शापूरजी पालनजी ही सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाची कंपनी असून, तिचे टाटा सन्समध्ये सर्वाधिक वैयक्तिक समभाग आहेत. मिस्त्री यांच्या वतीने शापूरजी पालनजी हकालपट्टीच्या विरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्याचा कंपनीकडून इन्कार करण्यात आला. मिस्त्री यांच्या हकालपट्टीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा कोणताही निर्णय कंपनीने घेतलेला नाही. असा निर्णय झालाच, तर तो अधिकृतरीत्या कंपनीच्या वतीने कळविला जाईल, असे शापूरजी पालनजीच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. टाटांनी मात्र, न्यायालयीन लढ्याची तयारी करत सर्वोच्च न्यायालयासह, मुंबई उच्च न्यायालय व राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात कॅव्हेट दाखल करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
टाटांनी का केली कॅव्हेट?
मिस्त्री हे न्यायालयात गेलेच. टाटा सन्सच्या अनुपस्थितीत कोणत्याही प्रकारचा एकतर्फी निर्णय लागू नये, यासाठी ही खबरदारी टाटांच्या वतीने घेण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अंतरिम निर्णय देण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घेण्यात यावे, अशी विनंती कॅव्हेटमध्ये करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिस्त्री यांच्या वतीने कॅव्हेट दाखल
दरम्यान, टाटा सन्सचे पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या वतीनेही तीन कॅव्हेट दाखल करण्यात आली आहेत. प्रसिद्ध कायदे संस्था अमरचंद मंगलदासने मिस्त्री यांच्या वतीने रतन टाटा, टाटा सन्स आणि सर दोराबजी ट्रस्ट यांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केले. याशिवाय सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. या कंपनीच्या वतीनेही रतन टाटा आणि टाटा सन्स यांच्या विरोधात स्वतंत्र कॅव्हेट दाखल करण्यात आले.