बिहारच्या महाआघाडीत लढाईआधीच ‘यादवी’

By Admin | Published: September 4, 2015 01:23 AM2015-09-04T01:23:26+5:302015-09-04T01:23:26+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत ‘मोदी मॅजिक’चा मुकाबला करण्यासाठी जुने वैमनस्य विसरून एकजूट झालेला जनता परिवार ‘यादवी’मुळे पुन्हा विखुरला. जागावाटपावरून असंतुष्ट असलेल्या

The battle of 'Mahadevi' | बिहारच्या महाआघाडीत लढाईआधीच ‘यादवी’

बिहारच्या महाआघाडीत लढाईआधीच ‘यादवी’

googlenewsNext

लखनऊ : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘मोदी मॅजिक’चा मुकाबला करण्यासाठी जुने वैमनस्य विसरून एकजूट झालेला जनता परिवार ‘यादवी’मुळे पुन्हा विखुरला. जागावाटपावरून असंतुष्ट असलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीने (सपा) गुरुवारी महाआघाडीशी काडीमोड घेत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
या वर्षाच्या प्रारंभी एकत्रित आलेल्या जनता परिवारातील सहा पक्षांपैकी सपा हा एक महत्त्वाचा घटक पक्ष असून, त्याने वेगळी चूल मांडण्याचे ठरविल्याने संयुक्त जनता दलाचे (संजद)नेते नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना फार मोठा हादरा बसला आहे.
सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत उपरोक्त निर्णय झाला. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते रामगोपाल यादव यांनी पत्रकारांना या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, राज्य विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी केवळ ५ जागा सपाला देण्याचा प्रस्ताव अपमानास्पद आहे. जागावाटप करण्यापूर्वी सपासोबत विचारविनिमय करणे हे जनता परिवारातील इतर प्रमुख घटक पक्षांचे कर्तव्य होते परंतु असे घडले नाही. माध्यमांमधून आम्हाला याबाबत माहिती मिळाली. हा ‘आघाडी धर्म’ नाही. पाच जागांना पक्षश्रेष्ठींची सहमती नव्हती आणि प्रामुख्याने बिहारमधील पक्ष कार्यकर्त्यांना हे अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून राज्यात सन्मानाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश अध्यक्ष रामचंद्र यादव पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार करतील.
महाआघाडीत संजद आणि राजद या दोन्ही पक्षांना प्रत्येकी १०० जागा देण्यात आल्या असून काँग्रेस ४० जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त ३ जागा आल्या आहेत.(वृत्तसंस्था)



—————————-कोट-
कोट
मला सपाच्या निर्णयाची कल्पना आहे. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आमची महाआघाडी कायम राहील. आम्ही चर्चा करू. तूर्तास सविस्तर बोलता येणार नाही. पण याचा आमच्या महाआघाडीवर विपरीत परिणार होणार नाही याची ग्वाही देतो.
-शरद यादव, अध्यक्ष,संजद
———————
कोट
बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पक्ष वेगवेगळे होतील आणि त्यांच्यात समझोता होऊ शकत नाही याची मला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच मी जाणूनबुजून सपाच्या ‘डेथ वॉरंट’ वर हस्ताक्षर करू शकत नाही असे म्हटले होते. या संपूर्ण प्रकारानंतर जनता परिवार कधी एकत्र येत होता असे समजण्याचे कारण नाही.
रामगोपाल यादव
सपाचे प्रवक्ते,महासचिव
———————
महाआघाडीची ‘स्वाभिमान रॅली’ झाल्यानंतर मुलायम सिंग यांचा स्वाभमान जागा झालेला दिसतोय! महाआघाडी हे बुडणारे जहाज असल्याचे सिद्ध झाले आहे. बुडणाऱ्या जहाजावर राहणे कोणालाच आवडत नसल्याने मुलायम सिंग यांनी त्यातून सर्वप्रथम बाहेर उडी मारली आहे.
-सैयद शाहनवाज हुसैन, नेते, भाजपा
———————————————-
राजद नेते रघुनाथ झा सपामध्ये
पाटणा: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ झा यांनी गुरुवारी पक्षाचे पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष लालूप्रसाद यादव ज्येष्ठ नेत्यांना डावलून केवळ आपल्या कुटुंबावरच लक्ष केंद्रित करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजदमधील ब्राह्मण चेहरा मानले जाणारे ७६ वर्षीय झा यांनी यावेळी समाजवादी पार्टीत समावेशाची घोषणाही केली. त्यांनी लालूप्रसाद यादव यांना पत्राद्वारे आपला निर्णय कळविला आहे.

Web Title: The battle of 'Mahadevi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.